डीएसकेंच्या सर्व मालमत्तांची माहिती मागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:54 AM2018-02-09T00:54:05+5:302018-02-09T00:55:19+5:30

पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरू असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले.

Asked for all the properties of DSK, assurance given in two days | डीएसकेंच्या सर्व मालमत्तांची माहिती मागविली

डीएसकेंच्या सर्व मालमत्तांची माहिती मागविली

googlenewsNext

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत सध्या बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याकडे चौकशी सुुरू असून त्यांना त्यांच्या सर्व मालमत्तेची माहिती असलेली २४ मुद्द्यांची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे़ ही माहिती आपण दोन दिवसांत देऊ, असे आश्वासन डी़ एस़ कुलकर्णी यांनी पोलिसांना दिले आहे़
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २८ आॅक्टोबर २०१७ रोजी कुलकर्णी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाने त्यांना ५० कोटी रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे़ परंतु, गेल्या महिन्याभरापासून ते पैसे भरण्यास कुलकर्णी यांना अपयश आले आहे़
त्यामुळे गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेत दररोज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले़ त्याप्रमाणे कुलकर्णी दाम्पत्य बुधवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहिले होते़ गुरुवारीही त्यांची दोन टप्प्यात चौकशी करण्यात आली़
>चौकशीत डीएसकेंकडे मागण्यात आलेली माहिती बांधकाम व्यवसायाव्यतिरिक्त इतर कोणकोणते व्यवसाय करता़ सध्या करीत असलेल्या सर्व व्यवसायाची कागदपत्रे, भारतात कोणकोणते बांधकाम प्रोजेक्ट अपूर्णावस्थेत आहेत़
परदेशातील बांधकाम प्रकल्प, विविध व्यवसायांमध्ये परिवारातील कोणकोणत्या व्यक्ती मदत करतात़ निधी कोठून मिळवला़ कायमस्वरुपी व तात्पुरता स्टाफ किती़ सर्वांकडे मिळून किती वाहने आहेत़ पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या नावे महाराष्ट्र बँक, बाजीराव रोड शाखेतील २ खात्यांची माहिती, २००७ पासून डीएसके ग्रुप कंपन्या, संचालकांचे सर्व पॅन क्रमांक, विवरणपत्रे, कुटुंबातील सर्व सदस्य व संचालकांच्या क्रेडिट व डेबिट कार्डची यादी, ग्रुपमधील सदस्य, संचालकांच्या ट्रस्टची कागदपत्रे, आयकर विवरणपत्रे, ज्या कंपनी, फर्ममध्ये भागीदार आहात त्या कंपनीमधून आपण आपल्या वैयक्तिक खर्चासाठी किती रक्कम काढल्याचा तपशील.आपल्या पत्नीने वैयक्तिक कारणासाठी कोणत्या बँकांकडून कर्ज घेतली त्याची कागदपत्रे, बँक आॅफ बडोदा, जळगाव जनता सहकारी बँकेकडून पत्नीने किती कर्ज कशासाठी घेतले व कोठे वापरले याची माहिती, आपल्या कुटुंबाच्या नावे विमा कंपनीमध्ये किती रकमेची विमा, ठेव, गुंतवणूक केलेली आहे़
तसेच म्युच्युअल फंड व शेअर्सच्या कोणत्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक असा सर्व तपशील देण्याची मागणी पोलिसांनी कुलकर्णी यांच्याकडे केली असून दोन दिवसात ही माहिती देतो, असे त्यांनी पोलिसांना आश्वासन दिले आहे़
>हेमंती कुलकर्णी यांचा
७ कोटींचा विमा
हेमंती कुलकर्णी यांच्या नावे ७़२० कोटी रुपयांचा विमा व म्युच्युअल फंड असून १़१८ कोटी रुपयांचे शेअर्स, विद्या सहकारी बँक, अनल्स प्रॉपर्टीज अँड इंडस्ट्रीजचे शेअर्स घेतले आहे़ त्याबाबतची कागदपत्रे मागण्यात आली आहे़ हेमंती कुलकर्णी यांना मिळत असलेल्या मालमत्तेच्या भाड्याबाबतची कागदपत्रे मागण्यात आली आहे़
डीएसके यांचा मुलगा शिरीष यांच्या ट्रम्प टॉवरमधील फ्लॅटबाबत बरीच चर्चा झाली आहे़ पोलिसांनी त्याची दखल घेऊन त्यांचे लग्न कधी, कोठे तसेच लग्नात किती खर्च केला आहे़ या खर्चासाठी आपण रक्कम कशी उभी केली, याचीही कागदपत्रे मागण्यात आली आहे़

Web Title: Asked for all the properties of DSK, assurance given in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.