पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणारी पालिकाच ‘घाण’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 03:09 PM2019-07-15T15:09:00+5:302019-07-15T15:15:41+5:30

स्वच्छतेसाठी पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणाऱ्या महापालिकेच्या इमारतीच जागोजाग घाण झालेली आहे. सर्वत्र थुंकीचे पाट अन् जाळ्याजळमटे, अस्वच्छता अशी अवस्था आहे.

Asking for 10 minutes for cleaning coporation real condition is very bad | पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणारी पालिकाच ‘घाण’

पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणारी पालिकाच ‘घाण’

Next
ठळक मुद्देमुख्य इमारतीत पिचकाऱ्या: प्रशासनाचे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ धोरण, उपाययोजनांची आवश्यकता

लक्ष्मण मोरे- 
पुणे : ‘स्वच्छ भारत अभियान २०१८’च्या स्पर्धेत पुणे महापालिकेची खालच्या क्रमांकावर घसरगुंडी झाल्यानंतर आता २०१९ च्या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेमध्ये नागरी सहभाग वाढावा याकरिता शहरात सर्वत्र  ‘पुणेकरांनो तुमच्याकडे दहा मिनिटे आहेत का?’ अशा आशयाची होर्डिंग लावली आहेत.

परंतु, स्वच्छतेसाठी पुणेकरांकडे दहा मिनिटे मागणाऱ्या महापालिकेच्या इमारतीच जागोजाग घाण झालेली आहे. सर्वत्र थुंकीचे पाट अन् जाळ्याजळमटे, अस्वच्छता अशी अवस्था आहे. त्यामुळे प्रशासनाचे धोरण ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ असेच असल्याची टीका होऊ लागली आहे. 
महापालिकेकडून मोठा गाजावाजा केलेल्या केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पालिकेचा ३७ वा क्रमांक आला. या घसरलेल्या मानांकनावरुन त्या वेळी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी पक्षासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. यानिमित्ताने कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपला ‘टार्गेट’ करण्याचा प्रयत्न केला होता. सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभागृहात महापौरांसमोर येत आंदोलनही केलेले होते.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अनेक नगरसेवकांनी त्यांच्या भागातील भिंती रंगवून घेतल्या होत्या. काही माननियांनी तर स्वत:ची नावे व स्वत:च्या पक्षाची चिन्हेही रंगवून घेतली. यावरुन बरीच टीकाही झाली होती. तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये घनकचरा विभागाला दिले जातात. 
तरीही पालिकेचा नंबर ३७ वा आला. त्यामुळे त्यात खर्च झालेला पैसा कुठे गेला, याची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केलेली होती. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेपेक्षा चमको अधिकारी स्पर्धा घेतली असती तर एक दोन अधिकाऱ्यांचा नंबर नक्कीच लागला असता. 
त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची व सल्लागार कंपनीला दिलेले पैसे परत घेण्याची मागणी केली होती. परंतु, प्रशासकीय उदासीनतेमुळे याविषयावर पुढे काहीही होऊ शकले नाही. 
अनेक ठिकाणचे नळ गळत असतात. ठिकठिकाणी जाळ्या-जळमटे पसरलेली असून मुख्य लॉबीमधील पंखे पुसणेही स्वच्छता कर्मचाऱ्यांना शक्य झालेले नाही. ठिकठिकाणी खुल्या वायरींचे जाळे पसरलेले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेरही अशा वायरींचे भेंडोळे लटकताना दिसतात. 

स्वच्छ भारत अभियान २०१९ मोहिमेमध्ये नागरी सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ज्यांना या अभियानात काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी स्वच्छता मित्र, प्रेरक व्यक्ती, स्वच्छता दूत अशी कामे दिली जाणार आहेत. स्वच्छतेचा प्रसार, प्रचार व धोरण ठरविण्यामध्ये नागरिकांची मदत घेतली जाणार आहे

. दररोज दहा ते पंधरा जण चौकशी करीत असून, इच्छुकांचा डाटाबेस तयार केला जाणार आहे. त्यांच्याशी संवाद साधून काम केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
............
महापालिकेच्या आवारात तसेच इमारतीमध्ये गुटखा, पान, तंबाखू, मावा, पानमसाला आदी खाऊन पिचकारी मारणाऱ्यांवर जागेवरच दंडात्मक करण्याची घोषणा सुरक्षा विभागाने केली खरी, पण ही घोषणा हवेतच विरली आहे. पालिकेच्या आवारात पान, गुटखा, तंबाखू आदी खाऊन थुंकणाऱ्यांना चाप लावण्यासाठी आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करणार होता. परंतु, प्रशासनाचे हे पाऊल केवळ बोलाची कढी अन् बोलाचा भात ठरले आहे. 
.......
महापालिकेने शहरात पिचकारी बहाद्दरांवर कारवाई सुरु केली आहे. रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. अनेकदा अशा थुंकीबहाद्दरांकडून ती जागाच स्वच्छ करुन घेतली जाते. परंतु, शहरभर कारवाई होत असतानाच पालिकेच्या इमारतींमधील स्वच्छतागृहे, कोपरे व आडोशाच्या जागांवर या थुंकीबहाद्दरांनी रंगरंगोटी केल्याचे जागोजाग दिसते. पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारीही पान, तंबाखू, गुटखा खाऊन इमारतीमधील कोपरे, स्वच्छतागृहे, आडोशाच्या जागांवर पिंक टाकताना दिसतात. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या इमारतीमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांसह कर्मचारी अणि अधिकाऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश उपायुक्त माधव जगताप यांनी सुरक्षारक्षकांना दिले होते. 
.......

महााालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ची तयारी सुरू केली आहे. शहरभरात फलक लावून जाहिरातबाजी करण्यात येत आहे. परंतु महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये सर्वत्र अस्वच्छता पसरल्याचे दिसत आहे.पालिकेच्या नवीन आणि जुन्या इमारतींच्या प्रत्येक कोपऱ्यात पान, गुटखा आणि तंबाखू खाऊन पिचकाऱ्यांची रंगरंगोटी झालेली आहे. तसेच अनेक स्वच्छतागृहांची स्वच्छताही होत नसल्याचे चित्र आहे. पुणेकरांना स्वच्छतेसाठी कामाला लावू पाहणारी पालिकेची प्रशासकीय यंत्रणा स्वत:पासून कधी सुरुवात करणार, असा प्रश्न आहे. 

Web Title: Asking for 10 minutes for cleaning coporation real condition is very bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.