रात्रीच्यावेळी लिफ्ट मागणे बेतले महिलेच्या जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 01:33 PM2019-12-11T13:33:33+5:302019-12-11T13:35:39+5:30

रात्रीच्या वेळी तरुणाने महिलेला लिफ्ट दिली. त्यानंतर त्या महिलेने तरुणाकडे 10 हजार रुपयांची मागणी केल्याने तरुणाने महिलेला तिसऱ्या मजल्यावरुन फेकून दिल्याने तिचा मृत्यू झाला.

asking for lift at midnight cost her life | रात्रीच्यावेळी लिफ्ट मागणे बेतले महिलेच्या जीवावर

रात्रीच्यावेळी लिफ्ट मागणे बेतले महिलेच्या जीवावर

Next
ठळक मुद्देही घटना कोरेगाव पार्क येथील लेन नंबर ७ मधील एका इमारतीत रविवारी रात्री घडली होती.आराेपी व त्याच्या साथीदाराने हाेळकर पुलाजवळ महिलेचा मृतदेह नदीत टाकला

पुणे : लिफ्ट दिलेल्या महिलेने १० हजार रुपयांची मागणी केल्याने झालेल्या वादात तरुणाने ३० वर्षांच्या महिलेला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला होता. हा प्रकार आज उघडकीस आला असून या घटनेतील महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आश्रफ सय्यद (वय २०, रा़ बोपोडी) याला अटक केली आहे.

ही घटना कोरेगाव पार्क येथील लेन नंबर ७ मधील एका इमारतीत रविवारी रात्री घडली होती. त्यानंतर सय्यद याने मित्राच्या मदतीने या महिलेचा मृतदेह होळकर पुलाखाली टाकून पळून गेला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आश्रफ सय्यद हा बोपोडी येथे राहायला होता. काही दिवसांपासून तो कोरेगाव पार्क येथे राहत होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून आई कामशेतला राहते. 

रविवारी रात्री तो पुणे स्टेशनपासून बोपोडीला जात असताना एका महिलेने त्याल लिफ्ट मागितली. रात्रीची वेळ असल्याने त्याने तिला लिफ्ट दिली. तिला घेऊन तो सादलबाबा दर्ग्यापर्यंत आला. मोटारसायकलवरुन जाताना दोघात बोलणी झाली. त्यानंतर त्याने मोटारसायकल वळवून तो तिला घेऊन कोरेगाव पार्क येथे राहणाऱ्या बहिणीच्या इमारतीच्या टेरेसवर गेला. तेथे तिने त्याच्याकडे १० हजार रुपयांची मागणी केली.त्यावरुन त्यांच्यात वाद सुरू झाला.तेव्हा तिने त्याला चापट मारली. त्यानेही तिला मारहाण केली व रागाच्या भरात तिला तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून ढकलून दिले. त्याने खाली येऊन पाहिले तर तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने आपल्या एका मित्राला बोलावून घेतले. त्या दोघांनी स्कूटरवर तिला मध्ये घेऊन ते होळकर पुलाजवळ आले. त्यांनी तिचा मृतदेह नदीत टाकला. 

सोमवारी सकाळी खडकी पोलिसांना नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला. खडकी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करून तपास सुरु केला. या प्रकरणाचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना हा सर्व आश्रफ सय्यद याने केल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी मंगळवारी सय्यद याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला. त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे.
 

Web Title: asking for lift at midnight cost her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.