चित्रांच्या माध्यमातून उलगडणार ग्रामीण जीवनाचे पैलू; पुण्यात 'व्हिलेज लाईफ' चित्रप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 03:17 PM2018-01-08T15:17:06+5:302018-01-08T15:18:58+5:30
ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात येणार आहे.
पुणे : चित्रकार दत्तात्रय शिंदे यांनी रेखाटलेल्या ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात येणार आहे. खेड्यातील निसर्ग, तेथील माणसे, प्राणी, खेड्यातील घरे असे ग्रामीण जीवनातील विविध पैलू चित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत.
प्रदर्शनाचे उद्घाटन सर जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, शिल्पकार दिनकर थोपटे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक नंदकुमार सागर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त राजकुमार लोढा या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
दत्तात्रय शिंदे यांनी ‘ग्रामीण जीवन’ या विषयावर आधारित जेजुरी, सासवड, ओतूर, जुन्नर या परिसरातील चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. खेड्यातील घरे, डोंगर, गाई, मेंढ्या, बकरी, झोपड्या, धनगरांची पाले अशा प्रकारचे विषय आपल्या चित्रांच्या माध्यमातून रेखाटले आहेत. जलरंग, तैलरंग, अॅक्रेलिक या रंगांचा वापर करून ही चित्रे बनविण्यात आली आहेत.
चित्रकार दत्तात्रय शिंदे हे चित्रकला शिक्षक असून ते मावडी क. प. या गावातील रहिवासी आहेत. खेड्यातील निसर्ग, तेथील घरे, माळराने आणि खेड्यातील जीवन आपल्या कलेद्वारे त्यांनी कागदावर उमटवले आहे.