आसामला पहिल्या डावात आघाडी, २७९ धावांच्या उत्तरात महाराष्ट्र सर्व बाद २५३, ऋतुराज गायकवाडचे शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:28 AM2017-11-27T04:28:25+5:302017-11-27T04:28:48+5:30

सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावूनदेखील इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आसामविरुद्धच्या लढतीत यजमान महाराष्ट्र संघ पहिल्या डावात २६ धावांनी माघारला.

 Assam scored the first innings lead in 279 runs, Maharashtra scored 253 runs, Rituraj Gaekwad's century | आसामला पहिल्या डावात आघाडी, २७९ धावांच्या उत्तरात महाराष्ट्र सर्व बाद २५३, ऋतुराज गायकवाडचे शतक

आसामला पहिल्या डावात आघाडी, २७९ धावांच्या उत्तरात महाराष्ट्र सर्व बाद २५३, ऋतुराज गायकवाडचे शतक

Next

पुणे : सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शानदार शतक झळकावूनदेखील इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत आसामविरुद्धच्या लढतीत यजमान महाराष्ट्र संघ पहिल्या डावात २६ धावांनी माघारला. दुस-या दिवसअखेर आसामने ३ बाद १०१ धावा करीत आपली आघाडी १२७ वर नेऊन ठेवली.
पूना क्लबच्या मैदानावर ही लढत सुरू आहे. आसामला तीनशेच्या आत रोखल्यानंतर महाराष्ट्राला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, महाराष्ट्राच्या गोलंदाजांप्रमाणेच आसामच्या गोलंदाजांनीही पोषक खेळपट्टीचा लाभ उचलत आपल्या संघाला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. सलामीवीर ऋतुराजचा (१२६ धावा, २१० चेंडू, १ षटकार, १४ चौकार) अपवाद वगळता इतर भरवशाच्या फलंदाजांनी
नांगी टाकली.
कालच्या ३ बाद ६४ वरून आज पुढे खेळणा-या महाराष्ट्राला पहिल्या सत्रात २ धक्के बसले. काल ७ धावांवर नाबाद असलेला रोहित मोटवानी १५ धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठीही ४ धावा करून तंबूत परतला. हे दोन्ही बळी पल्लवकुमार दास याने टिपले. ५ बाद ९३ अशा वाईट स्थितीतून ऋतुराज-प्रयाग भाटी या जोडीने महाराष्ट्राला बाहेर काढले. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली. भाटीने ५६ चेंडूंत ५ चौकारांसह ३१ धावा केल्या.
भाटी बाद झाल्यावर ऋतुराजने श्रीकांत मुंढेसह (३० चेंडूंत ४ चौकारांसह २७) सातव्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राला आघाडी मिळवून देण्याचे आटोकाट प्रयत्न केले. सत्यजित बच्छावने १४ चेंडूंत १५ धावांचे योगदान दिले. मात्र, आसामच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत महाराष्ट्राचे पहिल्या डावात आघाडी घेण्याचे इरादे उधळून लावले. राहुल सिंग याने ऋतुराजला बाद करीत महाराष्ट्राच्या डावाला पूर्णविराम दिला. आसामतर्फे राहुल सिंगने सर्वाधिक ४, प्रीतम दास आणि पल्लवकुमार दास यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
दुसºया डावात आसामने आश्वासक प्रारंभ केल्यानंतर अखेरच्या सत्रात महाराष्ट्राच्या गोलंदाजांंनी ३ बळी मिळवत सामना रंगतदार स्थितीत आणून ठेवला. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाहुण्या संघाने ३५ षटकांत ३ बाद १०१ धावा केल्या होत्या. महाराष्ट्रातर्फे प्रदीप दाढेने १७ धावांत २, तर राहुल त्रिपाठीने ७ धावांत १ गडी बाद केला.
सामन्याचे अद्याप २ दिवस शिल्लक आहेत. खेळपट्टीचा नूर पाहता या सामन्याचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची समान संधी आहे. आसामचा दुसरा डाव झटपट गुंडाळण्याची जबाबदारी गोलंदाजांनी पार पाडली आणि फलंदाज लौकिकाला जागले तर यजमान महाराष्ट्र हा सामना
जिंकू शकतो. दुसरीकडे दुसºया डावात चांगली फलंदाजी करून महाराष्ट्रासमोर विजयासाठी आव्हानात्मक लक्ष्य ठेवून गोलंदाजीच्या जोरावर बाजी मारण्याची संधी आसामला असेल.

संक्षिप्त धावफलक

आसाम : पहिला डाव : सर्व बाद २७९.
महाराष्ट्र : पहिला डाव : ६८.२ षटकांत सर्व बाद २५३ (ऋतुराज गायकवाड १२६, प्रयाग भाटी ३१, सत्यजित बच्छाव १५, रोहित मोटवानी १५, चिराग खुराणा ८, अंकित बावणे ६, राहुल त्रिपाठी ४, निकित धुमाळ १, नौशाद शेख ०, प्रदीप दाढे नाबाद ०, राहुलसिंग ४/६३, प्रीतम दास २/६२, पल्लवकुमार दास २/६०, रजत खान १/२, अरूप दास १/५४).
आसाम : दुसरा डाव : ३५ षटकांत ३ बाद १०१ (रिषव दास ३५, अभिषेक ठाकुराई ३५, पल्लवकुमार दास २६, प्रदीप दाढे २/१७, राहुल त्रिपाठी १/७).

Web Title:  Assam scored the first innings lead in 279 runs, Maharashtra scored 253 runs, Rituraj Gaekwad's century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.