‘छत्रपती’चे संचालक बबन बांगल यांच्यावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:05 AM2021-05-03T04:05:55+5:302021-05-03T04:05:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : छत्रपती साखर कारखान्याचे संचालक व पिंपळे (ता. इंदापूर) गावचे माजी सरपंच अनिल बबन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : छत्रपती साखर कारखान्याचे संचालक व पिंपळे (ता. इंदापूर) गावचे माजी सरपंच अनिल बबन बागल यांचेवर शनिवारी (दि. १) प्राणघातक हल्ला करण्यात आला. धारदार शस्त्राच्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती वर्तवली जात आहे.
या प्रकरणी पिंपळे गावच्या विद्यमान सरपंचांसह आठ व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भागवत रामचंद्र जाधव, रोहन दत्तू चोपडे, आकाश अनिल तांबे, कुंडलिक जनार्दन भिसे, तानाजी लक्ष्मण जाधव, गणेश हरीभाऊ चोरमले, उमेश भिवा जांभळे, बाळासाहेब कोंडीबा मोहिते (रा. सर्व पिंपळे, ता. इंदापूर) यांचेविरुध्द भारतीय दंडविधान कलम ३०७, १२० व ५०६ व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादीनुसार आरोपी भागवत रामचंद्र जाधव, रोहन दत्तू चोपडे व आकाश अनिल तांबे यांनी इतर आरोपींच्या सांगण्यावरून कट करून अनिल बबन बागल यांच्यावर धारदार लोखंडी कोयत्याने हल्ला करुन गंभीर जखमा करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यामध्ये बागल यांचे डोके, मान व हातास गंभीर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भागवत रामचंद्र जाधव, रोहन दत्तु चोपडे, बाळासाहेब कोंडीबा मोहिते यांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
पूर्ववैमनस्यातून आणि अतिक्रमणबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या दाव्यामुळे हा हल्ला झाला असल्याची शक्यता नागरिकांत चर्चिली जात आहे. तर पिंपळे गावाला मारामारी आणि भांडणाचा इतिहास असल्याचे पोलीस ठाण्यात दाखल प्रकरणावरून दिसून येत आहे.