भाई न म्हटल्याने झालेल्या भांडणातून तरुणावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:22+5:302021-05-03T04:06:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भाई न म्हटल्याने एक महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने तरुणावर ...

Assassination of a young man due to a quarrel without saying brother | भाई न म्हटल्याने झालेल्या भांडणातून तरुणावर प्राणघातक हल्ला

भाई न म्हटल्याने झालेल्या भांडणातून तरुणावर प्राणघातक हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भाई न म्हटल्याने एक महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने तरुणावर पालघन, कोयत्याने सपासप वार करून जबर जखमी केले. प्रयत्नांची शर्थ करीत जखमांवर तब्बल १०५ टाके घालून डॉक्टरांनी या तरुणाचा प्राण वाचविला.

कोंढवा पोलिसांनी क्लॉईड, हर्षे, भूषण व त्याच्या ६ ते ७ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

फरहान अख्तर पिरजादे (वय १९, रा. गगन एमराल्ड सोसायटी, कोंढवा खुर्द) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील सनश्री सोसायटीच्या समोरील रोडवर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, क्लॉईड व त्याचे साथीदार यांचा एक महिन्यापूर्वी फरहान याच्याबरोबर वाद झाला होता. क्लॉईड याने फरहान याला आपल्याला एकेरी भाषा वापरायची नाही, भाई म्हणायचे, असे धमकाविले होते. यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा क्लॉईड याने फरहान याला लवकरच भेटू अशी धमकी दिली होती. फरहान याने दुर्लक्ष केले होते. त्याची पोलिसांकडे तक्रार केली नव्हती.

फरहान व त्याचे मित्र शुक्रवारी सायंकाळी फुटबॉल खेळण्यासाठी जात होते. या वेळी क्लॉईड याने एक महिन्यापूर्वीच्या भांडणाच्या रागातून फरहानवर पालघनने चेहऱ्यावर वार केला. त्याचा साथीदार भूषण याने कोयत्याने फरहान याच्या डाेक्यावर वार केला. तेव्हा त्याने हात मध्ये घातला तर त्याच्या हातावर, दंडावर व मनगटावर, खांद्यावर सपासप वार करुन जबर जखमी केले. या वेळी मध्ये पडलेले त्याचे मित्र ओवेस, फरदीन व जिशान शेख यांनाही धारदार शस्त्राने व बेसबॉलच्या स्टीकने मारहाण करुन जखमी केले.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक एस. के. सोनवणे, स्वप्नील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Web Title: Assassination of a young man due to a quarrel without saying brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.