मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या मुलीला सात तास ठेवले डांबून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:13 PM2018-06-26T22:13:58+5:302018-06-26T22:17:31+5:30
मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला तब्बल सात तास डांबून ठेवून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला तब्बल सात तास डांबून ठेवून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. असे कृत्य करणाऱ्या एकाला लोणी-काळभोर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लक्ष्मण मरीबा भुरे (रा. उरूळी देवाची, ता. हवेली जि. पुणे मुळ रा. चाकुर ता. दगलुर) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत आठवीत शिकणाऱ्या १६ वर्षाच्या मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी मांजरीचे पिल्लू आणण्यासाठी गेली असताना आरोपीने तिला ओढून जबरदस्तीने घरात नेले. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करताच तिने विरोध केल्यानंतर भुरे याने तिचे हातपाय ओढणीने बांधले. तसेच तिचे तोंडही बांधले. त्यानंतर पिडीत मुलीच्या घरच्यांनी भुरेच्या घराचा दरवाजा वाजविल्यानंतर भुरेने पिडीत मुलीला ओरडू नको अशी धमकी दिली. परंतु, भुरेबद्दल संशय अधिक बळावल्याने दरवाजा उघडल्यानंतर भुरेने केलेला सर्व प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्याला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली