अधिका-याला मारहाण
By admin | Published: December 1, 2014 11:36 PM2014-12-01T23:36:07+5:302014-12-01T23:36:07+5:30
पुणे-नाशिक महामार्गाच्या राजगुरुनगर बाह्यवळणाच्या मोजणीसाठी पोलिसांच्या फौजफाट्यासह आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखले.
राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गाच्या राजगुरुनगर बाह्यवळणाच्या मोजणीसाठी पोलिसांच्या फौजफाट्यासह आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखले. तसेच कथित ठेकेदार कंपनीमार्फत मोजणीच्या पाहणीसाठी आलेल्या खान (पूर्ण नाव समजू शकले नाही.) नावाच्या अधिकाऱ्यास शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केली.
एकंदरीत झालेला राडा पाहून आणि शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक येत्या गुरुवारी लावण्याचे नक्की करून तोपर्यंत मोजणी थांबविण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला.
आजच्या मोजणीच्या नोटिसा शेतकऱ्यांना मिळाल्या होत्या, त्याच्या निषधार्थ करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनानंतर चांडोलीला मोजणीसाठी अधिकारी जाणार असल्याचे समजल्याने शेतकरी विरोधासाठी सज्जच होते. बाह्यवळणाच्या मोजणीसाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) संजय पाटील, खेडचे उपविभागीय अधिकारी हिम्मतराव खराडे, तहसीलदार प्रशांत आवटे, पुणे - नाशिक महामार्गाचे तांत्रिक अधिकारी डी. एस. झोडगे, पोलीस निरीक्षक आर. व्ही. इंगवले, डी. बी. पाटील, पोलीस उपनिरीक्षक एस. जे. वायदंडे हे प्रचंड पोलीस बंदोबस्तात मोजणीसाठी गेल्याचे समजताच जवळपास पाचशे शेतकरी घटनास्थळी आले. त्या वेळी अधिकाऱ्यांमध्ये आणि कथित कंपनीच्या माणसांमध्ये चर्चा सुरू होती. पुणे-नाशिक महामार्गावर टोलनाक्याजवळ मोजणीचे साहित्य उभे करताच शेतकऱ्यांनी ते हिसकावले. त्यानंतर येथे मोजणीसाठी आलेल्या खान (पूर्ण नाव समजू शकले नाही) या खासगी कंपनीच्या मोजणी अधिकाऱ्याला संतप्त शेतकऱ्यांच्या जमावाने चांगलाच चोप दिला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना थांबविले. (प्रतिनिधी)