एकतर्फी प्रेमातून महिलेवर प्राणघातक हल्ला; आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास
By नम्रता फडणीस | Published: October 26, 2023 08:04 PM2023-10-26T20:04:54+5:302023-10-26T20:05:06+5:30
महिला आणि आरोपी हे दोघेही एकाच सोसायटीत काम करत होते
पुणे: एकतर्फी प्रेमातून पीडित महिलेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सश्रम करावास आणि ५ हजार रुपये दंड तसेच ६ महिने साधा कारावास आणि १ हजार रूपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.जी.चव्हाण यांनी सुनावली. दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अरुणकुमार राजकुमार साहू (वय २२,रा.कल्याणी नगर मूळ रा. सालेपूर ता.सिंधिया बिहार) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पीडित महिला आणि आरोपी हे दोघेही एकाच सोसायटीत काम करत होते. तिथेच आरोपीची पीडित महिलेशी ओळख झाली. त्या नंतर पीडित महिलेने तिथले काम सोडले होते. घटनेच्या १५ दिवसांपूर्वी आरोपी पीडित आधीच लग्न झाले आहे. मला दोन मुले आहेत असे सांगून आरोपीला नकार दिला होता. तेव्हा आरोपीने एकतर्फी प्रेमातून लग्नाची गळ घातली होती. त्याला पीडित महिलेने विरोध केला असता त्याने हातातील कोयत्याने 'तुला खल्लास करतो' असे म्हणत पीडित महिलेवर प्राण घातक हल्ला केला. पीडित महिलेला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपीवर भादंवि कलाम ३०७ , ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात सरकारी वकील संतोषकुमार पताळे आणि शुभांगी देशमुख यांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. आर. बी लोखंडे यांनी तापसी अधिकारी म्हणून काम पाहिले, तर येरवडा पोलीस ठाण्याचे हवालदार मोहन गिरमे आणि विनोद कायगुडे यांनी तपासात सहकार्य केले.