वाकी येथे दोघांवर प्राणघातक हल्ला; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:15 AM2021-08-12T04:15:15+5:302021-08-12T04:15:15+5:30
चाकणजवळील वाकी खुर्द (ता. खेड) येथे भामा नदीच्या पुलावर सोमवारी (दि.९) रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. ...
चाकणजवळील वाकी खुर्द (ता. खेड) येथे भामा नदीच्या पुलावर सोमवारी (दि.९) रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि.१) चाकण पोलिसांनी हॉटेल मालकासह दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेमंत संतोष सुतार (रा. लादवड, ता. खेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सूरज विठ्ठल वाळुंज (वय २८, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) असे मोटारीचे चाक पायावरून गेल्याने गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी सूरज वाळुंज याच्या फिर्यादीवरून वाकी खुर्द येथील हॉटेल सागरचा मालक ऋतिक वहिले याच्यासह मयूर येवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. संकेत लांडे, हेमंत सुतार, अनिकेत जावळे व अमोल दिघे हे सोमवारी (दि. ९) वाकी खुर्द येथील हॉटेल सागर येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्या वेळी मद्यपान केल्यानंतर किरकोळ कारणावरून हेमंत याने हॉटेल सागरचा मॅनेजर धीरज आणि कूक यांना मारहाण केली. त्यावेळी हॉटेलचे मालक वहिले व मित्रांनी हे भांडण मिटवले. त्यानंतर सर्व जण दुचाकींवरून घरी जाण्यासाठी निघाले. हॉटेलमध्ये भांडण करणाऱ्या हेमंत यास हॉटेल मालक ऋतिक वहिले याने फोन करून भांडण केल्याच्या रागातून शिवीगाळ व दमबाजी केली. हेमंत सुतार याने आम्ही भामा नदीच्या पुलाजवळ हॉटेल शेतकरी येथे थांबल्याचे हॉटेल मालक ऋतिक वहिले यांस सांगितले. त्यानंतर सूरज वाळुंज व हेमंत सुतार पुणे-नाशिक महामार्गावरून विरुद्ध बाजूने भाम फाट्याकडे जात असताना रात्री ११ च्या सुमारास आरोपींनी कारने येत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील हेमंत व सूरज दोघेही खाली पडले. त्यानंतर सूरज वाळुंज याच्या पायावरून आराेपीने कार घातली. मोटार पायावरून गेल्याने सूरज वाळुंज जखमी झाला. हॉटेल मालक ऋतिक वहिले व मयूर येवले कारमधून खाली उतरले. त्यांच्या हातात तलवार आणि लाकडी दांडकी होती. रस्त्यावर पडलेल्या हेमंत याच्यावर लाकडी दांडकी आणि तलवारीने हल्ला केला. यात हेमंत सुतार याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल केला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे चाकण पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
फोटो : वाकी खुर्द (ता. खेड ) भामा नदीच्या पुलावरील घटनास्थळ परिसर.