देसाई महाविद्यालयात भरली विद्यार्थ्यांची विधानसभा
By admin | Published: February 14, 2015 11:56 PM2015-02-14T23:56:56+5:302015-02-14T23:56:56+5:30
लक्षवेधी सूचना या माध्यमातून एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी हुबेहूब विधानसभा साकारली.
पुणे : अनधिकृत बांधकामे... महिलांवरील अत्याचार... शेतकरी आत्महत्या अशा अनेक विषयांवर विरोधकांनी विचारलेले प्रश्न, त्याला सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आलेली उत्तरे, सरकारच्या निषेधार्थ विरोधी पक्षाने केलेला सभात्याग, मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना या माध्यमातून एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी हुबेहूब विधानसभा साकारली.
महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातील संसदीय कामकाजाची विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती मिळावी याकरिता एच. व्ही. देसाई महाविद्यालयात अभिरूप विधानसभेचे आयोजन करण्यात आले होते. कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी विरोधी पक्ष, सत्ताधारी, अध्यक्ष अशा विविध भूमिका पार पाडल्या. चालू घडामोडींवर मार्मिक भाष्य करीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुगलबंदी रंगली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. पठाडे, डॉ. गणेश राऊत, ए. पी. कुलकर्णी, प्रा. पीयूष पहाडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. नीता बोकील व
निनाद कुलकर्णी यांनी याचे आयोजन केले. विरोधी पक्षाचे काम पार पाडणाऱ्या संघास उत्कृष्ट
संघाचे पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर अमर शिंदे, नेहा रत्नपारखी यांना प्रथम, गणेश नवले व सारिका शिळीमकर यांना द्वितीय, शुभम जोशी व रूपाली भोसले यांना तृतीय, पूजा वाघमारे व प्रणिता राणावत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.