पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह तिघांना लाचप्रकरणी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 10:44 AM2022-04-12T10:44:08+5:302022-04-12T11:01:51+5:30
पुणे : शासकीय काम मिळविण्यासाठी नगरसेवकांसह अनेकांना टक्केवारी द्यावी लागते. त्याचवेळी काम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजूर करून घेण्यासाठीही अधिकाऱ्यांना ...
पुणे : शासकीय काम मिळविण्यासाठी नगरसेवकांसह अनेकांना टक्केवारी द्यावी लागते. त्याचवेळी काम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजूर करून घेण्यासाठीही अधिकाऱ्यांना टक्केवारी द्यावी लागत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. कोथरुडच्या सहाय्यक आयुक्तास लाच घेताना सापळा रचून रंगे हात पकडण्यात आले. त्याच्यासोबत कनिष्ठ अभियंता आणि शिपाईही जाळ्यात सापडले आहेत.
कोथरुड येथील ड्रेनेज लाइन व कॉंक्रिटीकरण कामाचे बिल मंजूर करून १५ हजार रुपयांची लाच घेताना देण्यासाठी महापालिकेच्या सहायक आयुक्तांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तिघांना पकडले. सहायक आयुक्त सचिन चंद्रकांत तामखेडे (३४), कनिष्ठ अभियंता अनंत रामभाऊ ठोक (५२) आणि शिपाई दत्तात्रय मुरलीधर किंडरे (४७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांनी कोथरुड येथील ड्रेनेज लाइन व कॉंक्रिटीकरणाचे काम केले आहे. या कामाचे बिल मिळण्याकरिता त्यांनी सचिन तामखेडे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी २५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. १५ हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी कोथरुड क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार हे सचिन तामखेडे यांना भेटले. त्यांनी लाचेची रक्कम कनिष्ठ अभियंता अनंत ठोक याच्याकडे देण्यास सांगितले. ठोक यांनी ही रक्कम शिपाई किंडरे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. कोथरूड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भारत साळुंखे तपास करीत आहेत.