सहायक अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:30 AM2018-05-11T03:30:36+5:302018-05-11T03:30:36+5:30
नवीन वीजजोड मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारताना महावितरणच्या भोसरी येथील कार्यालयातील सहायक अभियंत्यासह अन्य एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास भोसरी येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ करण्यात आली.
पिंपरी - नवीन वीजजोड मंजूर करून देण्यासाठी लाच स्वीकारताना महावितरणच्या भोसरी येथील कार्यालयातील सहायक अभियंत्यासह अन्य एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास भोसरी येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोसरी शाखेतील सहायक अभियंता रोहित अशोक डामसे (वय ३१, रा. पिंपळे गुरव) आणि लाच स्वीकारण्यास पुढे आलेला आशिष जगन्नाथ देसाई (वय ३३, रा. भोसरी, पुणे) अशी लाचप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी एक्स सर्व्हिसमन कॉपोर्रेशन लिमिटेडमध्ये वर्कशॉपसाठी व्यापारी गाळा घेतला आहे. या गाळ्यासाठी ‘थ्री फेज’जोडणीसाठी त्यांनी अर्ज केला होता. नवीन विद्युतजोड मंजूर करून देण्यासाठी खासगी इसम देसाई याने सहायक अभियंता डामसे यांच्यासाठी ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या विषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
भोसरी येथील महावितरणच्या कार्यालयाजवळ यातील पहिला हप्ता १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदार रक्कम देण्यास गेले. त्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून आशिष देसाई याला अभियंता डामसे आणि स्वत:साठी लाच घेताना रंगेहाथ पकडले.