Pune: महावितरणचा सहायक अभियंता ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 11:23 AM2023-09-02T11:23:33+5:302023-09-02T11:27:45+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, रवींद्र नानासाहेब कानडे (३७) असे लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे...
पुणे : महावितरण कार्यालयाच्या बाणेर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याला सरकारी विद्युत ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, रवींद्र नानासाहेब कानडे (३७) असे लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १) बाणेर येथील महावितरणच्या उपकेंद्रात करण्यात आली.
याबाबत एका ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली हाेती. तक्रारदार हे सरकारी विद्युत ठेकेदार आहेत. त्यांना आर.एम.सी. प्लँटसाठी लागणारा विद्युत पुरवठा करण्याचा ठेका मिळाला होता. हे काम शासकीय योजना १.३ टक्के तत्त्वाच्या नियमानुसार पूर्ण केले गेले. या कामाच्या पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी उपकेंद्र बाणेर कार्यालयातील सहायक अभियंता रवींद्र कानडे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
एसीबीच्या पथकाने २८, २९ आणि ३१ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांनी नियमानुसार पूर्ण केलेल्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी सहायक अभियंता कानडे याने ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी उपकेंद्र बाणेर कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रवींद्र कानडे याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबीचे पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करत आहेत.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.