सहायक पोलीस निरीक्षकाला दोन वर्षे सक्तमजुरी
By Admin | Published: July 25, 2015 04:17 AM2015-07-25T04:17:53+5:302015-07-25T04:17:53+5:30
तक्रारदारांच्या बाजूने तपास करून गुन्हा सिद्ध होणार नाही, असे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला
पुणे : तक्रारदारांच्या बाजूने तपास करून गुन्हा सिद्ध होणार नाही, असे दोषारोपपत्र न्यायालयात पाठविण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला २ वर्षे सक्तमजुरी आणि ८ हजार रुपये दंड, तर पोलीस नाईकला १ वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी सुनावली.
सहायक पोलीस निरीक्षक गुलाब दस्तगीर इनामदार (वय ४३, रा. कात्रज) आणि पोलीस नाईक सुनील पंढरीनाथ पोकळे (वय ४७, रा. कोथरूड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. कोथरूड आझादनगर येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीने याबाबत तक्रार दिली आहे.
भारतीय दंड संहिता कलम ४९८ (अ) विवाहितेचा छळ करणेनुसार गुन्हा दाखल करेन, तसे करायचे नसल्यास ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. त्या वेळी तडजोडीअंती तक्रारदारांनी ४० हजार रुपये लाच दिली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांच्या पत्नीने पुन्हा पोलिसांत तक्रार दिली. त्या वेळी १० हजार रुपये लाच घेऊन पोलिसांनी दोघांत समेट घडवून आणला. वाद न मिटल्याने तक्रारदारांच्या पत्नीने तक्रारदार, आई आणि त्यांच्या तीन बहिणींविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्या वेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तक्रारदाराला अटक केली. त्यानंतर तक्रारदारांनी न्यायालयातून जामीन मिळविला. आई, तीन बहिणींना अटकपूर्व जामीन मिळाला. त्या वेळी पोलीस चौकीत हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानुसार तक्रारदार पोलीस चौकीत गेले. त्या वेळी पैसे दिल्यास गुन्हा सिद्ध होणार नाही, असे दोषारोपपत्र न्यायालयात पाठवू, असे म्हणत २५ हजार रुपयांची लाच इनामदार याने मागितली. यानंतर आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
(प्रतिनिधी)