सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईचा पुण्यात खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:12 AM2021-05-09T04:12:44+5:302021-05-09T04:12:44+5:30
पत्र्याच्या शेडमध्ये भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या सहायक पोलीस अधिकाऱ्यांच्या आईचा डोक्यात पाईपने मारहाण करून खून केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस ...
पत्र्याच्या शेडमध्ये भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या सहायक पोलीस
अधिकाऱ्यांच्या आईचा डोक्यात पाईपने मारहाण करून खून केल्याची घटना
शनिवारी पहाटे उघडकीस आली आहे. या वेळी घरातील कपाटातून ६५ हजार रुपयांची
रोकड चोरून नेली.
शाहाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव
आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा विठ्ठल शेलार (वय ३२, रा. रविवार पेठ,
सातारा) यांनी फिर्याद दिली. दरम्यान, याप्रकरणी या महिलेकडे कामाला
असलेल्या एकाला पुण्यातून पळून जात असताना पकडले आहे.
शेलार हे सातारा पोलीस दलातील वाहतूक शाखेत सहायक पोलीस निरीक्षक आहेत.
त्यांनी पुण्यात खंडणीविरोधी पथकातही काम केले होते.
शाहाबाई यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. त्यांनी कामासाठी दोन जणांना
ठेवले आहेत. त्यातील एक त्यांचा नातेवाईक आहे. हे दोघेही दररोज सकाळी पाच
वाजण्याच्या सुमारास कामावर येतात. त्याप्रमाणे शनिवारी पहाटे ५ च्या
सुमारास ते कामावर आले होते. त्यावेळी त्यांना शाहाबाई दिसल्या नाहीत.
म्हणून त्यांनी माचिस मागण्यासाठी त्यांना आवाज दिला. तरी त्यांनी ओ दिली
नाही. त्यामुळे त्यांनी पत्र्याच्या शेडजवळ जाऊन पाहिले तर त्या पलंगावर
जखमी अवस्थेत दिसल्या. त्यांनी तातडीने ही माहिती वारजे
पोलिसांना दिली. शाहाबाई यांच्या डोक्यात
पाईपने मारहाण करुन खून केल्याचे दिसले, असे वारजे पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले.
गुन्हे शाखेच्या युनिट ३ मधील हवालदार राजेंद्र मारणे
यांना हा खून व चोरी त्यांच्याकडे यापूर्वी कामाला असलेल्या कामगाराने
केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार चौकशी केल्यावर तो उत्तर
प्रदेशात जाण्यासाठी त्याने बुकिंग केल्याची माहिती मिळाली. तांत्रिक
विश्लेषणानुसार तो संगमवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर दरोडा व
वाहनचोरी विरोधी पथकाने तातडीने संगमवाडी येथे धाव घेतली. तेथे
पार्किंगमध्ये असलेल्या बसमध्ये बसण्याच्या तयारी असलेल्या अफसर अस्लम
अली (वय १९, रा. रामनगर, मुळ गाव मिरापूर, जि. जौनपूर, उत्तर
प्रदेश) याला पकडले. तो या महिलेकडे ४ ते ५ महिन्यांपूर्वी कामाला होता.
त्यांच्याजवळील बँगेत गुन्हा करतेवेळी वापरलेले कपडे व इतर वस्तू होत्या़