पीक विमा कंपन्यांच्या चौकशीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:41+5:302021-08-18T04:15:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना त्रास होतो हे खरे आहे. संघटनेने त्यांच्या चौकशीचा प्रस्ताव द्यावा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना त्रास होतो हे खरे आहे. संघटनेने त्यांच्या चौकशीचा प्रस्ताव द्यावा, तशी शिफारस सरकारला करू,” असे आश्वासन कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
संघटनेने मंगळवारी (दि. १७) कृषी आयुक्तालयासमोर विमा कंपन्यांच्या विरोधात निदर्शने केली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी विमा कंपन्यांवर शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. कृषी विभागाचे अधिकारी व कंपन्यांचे साटेलोटे आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या नातेवाईक असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळते. सामान्य शेतकऱ्यांचा दावे मात्र विविध कारण दाखवत नाकारले जातात, असे तुपकर म्हणाले.
राज्यातील विमा कंपन्यांनी गेल्या काही वर्षात ३५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला. केंद्र व राज्य सरकार तसेच शेतकरी यांनी त्यांना हे पैसे दिले. यात कंपन्यांनी २५ हजार कोटी रूपये कमवले. या सर्व कंपन्यांच्या कामाची विशेष तपास पथक नियुक्त करून चौकशी करावी, अशी मागणी तुपकर यांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत केली.
धीरजकुमार यांनी तुपकर यांच्याबरोबर असलेल्या शेतकऱ्यांची काही प्रकरणे पाहिली. “कृषी आयुक्त कार्यालय या कंपन्यांवर थेट कारवाई करू शकत नाही. संघटनेने लेखी प्रस्ताव दिल्यास आपल्या शिफारसीसह तो सरकारला सादर करू,” असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.