खगोल आणि गणितज्ज्ञ प्रा. शशिकुमार चित्रे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 10:59 PM2021-01-11T22:59:08+5:302021-01-12T00:03:50+5:30
खगोल व गणिती शास्त्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या प्रा. शशिकुमार चित्रे यांचे आज निधन झाले. मुंबई येथे कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुणे/मुंबई - खगोल व गणिती शास्त्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या प्रा. शशिकुमार चित्रे यांचे आज निधन झाले. मुंबई येथे कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते. त्यांना २०१२ साली खगोल शास्रातील मोलाच्या योगदानाबद्दल 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
प्राध्यापक शशिकुमार चित्रे हे होमीभाभा फेलोशिप कौन्सिलचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांना २०१२ साली खगोल शास्रातील मोलाच्या योगदानाबद्दल 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सौर भौतिकशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र हे चित्रे यांच्या संशोधनाचे विषय होते.
प्रा. शशिकुमार चित्रे यांनी गणितात पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ड्यूक ऑफ एडिनबर्ग ही फेलोशिप प्राप्त केली. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत उपयोजित गणित आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रात 1963 मध्ये पीएच.डी मिळवली. त्यानंतर इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात अध्यापनाची देखील जबाबदारी सांभाळली. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेत काम केल्यानंतर ते १९६७ मुंबईला परतले आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये रुजू झाले. २००१ मध्ये ते याच संस्थेतून निवृत्त झाले होते.
प्रा. चित्रे यांच्या महत्वपूर्ण संशोधनाची आंतरराष्ट्रीय दखल घेतली गेली असून त्यांना 'इंटेलिजन्स अँड नॅशनल सिक्युरिटी अलायन्सेस' संस्थेकडून मानद वैज्ञानिक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.