व्यावसायिक भावाच्या लग्नात; राहत्या घरावर चोरट्यांचा डल्ला; तब्बल ११ लाखांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 07:45 PM2022-05-26T19:45:45+5:302022-05-26T19:45:56+5:30
गणेश पेठेतील एका व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी सव्वा दहा लाखाची रोकड, दागिणे, सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हीआर असा तब्बल १० लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला
पुणे : गणेश पेठेतील एका व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी सव्वा दहा लाखाची रोकड, दागिणे, सीसीटीव्ही कॅमेरे, डिव्हीआर असा तब्बल १० लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. व्यावसायिक हे त्यांच्या मावस भावाच्या लग्नासाठी गेल्यामुळे त्यांचे राहते घर २४ व २५ मे रोजी बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी करुन डल्ला मारला.
याप्रकरणी मोहम्मद शेख (वय ४३, रा. एसआरए इमारत, नाडेगल्ली, गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेख यांचा भंगार माल खरेदीचा व्यवसाय आहे. शेख यांच्या मावस भावाचा विवाह असल्याने त्यांनी घरातील कपाटात १० लाख २५ हजारांची रोकड ठेवली होती. लग्नाच्या खरेदीच्या गडबडीत शेख कुटुंबीय होते. चोरट्यांनी शेख यांच्या सातव्या मजल्यावरील सदनिकेचे कुलुप तोडले. कपाटातील १० लाख २५ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा १० लाख ८२ हजारांचा ऐवज लांबविला.
चोरट्यांनी शेख यांच्या सदनिकेच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तसेच चित्रीकरण रेकॉर्ड करणारा डीव्हीआर देखील चोरुन नेल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.