सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 01:28 PM2024-12-01T13:28:12+5:302024-12-01T13:28:23+5:30
मूल्यांची जपणूक करणे गरजेचे असून मुलांना लहानपणापासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे
पुणे: “एखादी व्यक्ती मोठी झाल्यानंतर समाजात त्याच्यासाठीची व्यवस्था तयार केली जाते. कधी सरकार तर कधी समाज ही व्यवस्था तयार करत असतो. अशा व्यक्तींच्या मनात समाजासाठी आपले काहीतरी देणे लागते ही भावना असणे अपेक्षित आहे. मात्र, ही भावना नसल्यास अशा व्यक्ती तसेच समाज भरकटू शकतो. त्यासाठी मूल्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज असली तरी ह्यूमन इंटेलिजन्सची देखील गरज आहे. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे,” असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुण्यात भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय १८ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि सकल जैन समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, बीजेएसचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, अभिनेते आमिर खान, सत्यजित भटकळ, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, हेमंत रासने, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, परिणय फुके, प्रशांत बंब, प्रकाश धारिवाल, गणपत चौधरी, विठ्ठल मणियार, विजय भंडारी, राजेंद्र लुंकड, वालचंद संचेती, राजेश मेहता, वल्लभ भन्साळी, राजेश जैन, डॉ. चैनराज जैन आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, भारतीय जैन संघटना, पाणी फाउंडेशन तसेच नाम फाउंडेशनकडून झालेल्या पाण्यासंदर्भातील कामामुळे राज्यातील गावांमधील नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. आपण सध्याच्या व्यवस्थेत परिवर्तन करू शकू, असा आत्मविश्वासही या चळवळीने दिला आहे. त्यामुळे अशा चळवळींना प्रोत्साहन देण्याचे काम यापुढे सरकार म्हणून करत राहू.
देशातील समस्या सोडवण्यासाठी जैन समाजाचा नेहमी पुढाकार
सध्या जल, जंगल आणि जमीन याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यातून देशातील बहुतांश समस्या दूर होतील. भारतीय जैन संघटनेने यात काम करण्याची गरज आहे. देशात ज्या ज्या वेळी समस्या आली, त्या त्या वेळी जैन समाजाने ती समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक आणि सामाजिक कामात मागील चाळीस वर्षांपासून शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे मोठे काम आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शरद पवार आपत्ती व्यवस्थापनचे नजक
संघटनेच्या वतीने मागील ४० वर्षांत केलेल्या कामांचा आनंद आम्ही साजरा करत आहोत. संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सुरुवातीला जैन समाजाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले. त्यातून खर्च कमी झाला आणि अप्रतिष्ठा ही प्रतिष्ठेत रूपांतरित झाली. लातूर भूकंपादरम्यान मदतीसाठी सर्वात प्रथम लोकमत आणि भारतीय जैन संघटना धावून आली. या आपत्तीत व्यवस्थापन कसे करावे, याचे धडे शरद पवार यांनी दिले. त्या अर्थाने पवार हे आपत्ती व्यवस्थापनाचे जनक आहेत. आजवरच्या काळात संघटनेने अनाथ मुलांचे पुनर्वसन, त्यांच्यासाठी शाळा उभारणी तसेच भावी जीवनासाठी मोठे काम केले आहे. - डाॅ. विजय दर्डा, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि सकल जैन समाज संघटनेचे अध्यक्ष
शिक्षणात मूल्यवर्धन व्हावे
तीस वर्षांपूर्वी मी एका लेखातून भविष्यात पाणी विकले जाईल, असे लिहिले होते. मात्र, आज तशीच स्थिती आहे. त्यामुळे पाणी संवर्धन करण्याची गरज असून, मी देखील त्यासाठी मोहीम चालविली आहे. ती तुम्ही पुढे नेण्याची गरज आहे. गावांतील तलावांचे खोलीकरण करून पुनर्भरण करणे आवश्यक आहे. संघटनेने देशातील १० जिल्ह्यांत अशी ३० हजार कामे केली आहेत. तसेच संघटनेने शिक्षणात केलेले काम मोठे आहे. शिक्षणात मूल्यवर्धन करत संघटनेच्या विचारांचा वारसा पुढे न्यायला हवा, असेही डॉ. विजय दर्डा म्हणाले.
गावागावांत पाण्यासंदर्भात काम करण्याची आवश्यकता
समाज आणि देशासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. गावागावांत पाण्यासंदर्भात काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही सध्या करत असलेले प्रयत्न केवळ सुरुवात आहे. भारतीय जैन संघटनेकडून खूप शिकायला मिळाले व अनुभवही मिळाला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी संघटना व पाणी फाउंडेशन काम करत आहे. राज्य सरकारही त्यात योगदान देईल. - आमिर खान, अभिनेता
पुणेकरांच्या सेवेसाठी जैन संघटनेने केलेले काम मोठे
देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत जैन समाजाचे योगदान मोठे आहे. समाज एकविचाराने राहिला. सर्वांनी एकत्रित आणि सातत्याने काम केले तर फार मोठे काम उभे राहते. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जैन समाज आहे. कोरोनाकाळात पुणेकरांच्या सेवेसाठी जैन संघटनेने केलेले काम मोठे आहे. - मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री
आपत्तीत जैन समाज सतत अग्रेसर
राज्यासह देशात येणाऱ्या आपत्तीत जैन समाज सतत अग्रेसर असतो. संघटना सध्या देशातील १० जिल्ह्यांत पाण्याच्या समस्येवर काम करीत आहे. पुढील काळात १०० जिल्ह्यांमध्ये हे काम वाढविले जाईल. - शांतीलाल मुथा, अध्यक्ष, भारतीय जैन संघटना