Maharashtra Bandh: अशा वेळी नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे; महाराष्ट्र बंदला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 04:33 PM2024-08-23T16:33:07+5:302024-08-23T16:33:19+5:30
विकृतीचा निषेध म्हणून आपण सुज्ञ नागरिकांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणे आवश्यक आहे
पुणे : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी येत्या २४ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक महाविकास आघाडीने दिली आहे. या बंदमध्ये मविआमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. डॉक्टर, वकील, पालक यांनीही बंदमध्ये सहभागी आवाहन मविआच्या नेत्यांनी केले आहे. तर या विकृतीचा निषेध म्हणून उद्धव ठाकरेंनी सुद्धा महाराष्ट्र बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. अशा घटनांच्या विरोधात आता पुणे व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शवला आहे. उद्या दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील असे महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले आहे.
रांका म्हणाले, उद्या शनिवारी २४ ऑगस्टला सर्व पक्षांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. कोलकाता डॉक्टरांवरील अत्याचार, नाशिक, बदलापूर, कोल्हापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार विरोधात महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार आहे. विकृतीच्या विरोधात हा बंद पुकारला आहे. वास्तविक पाहता हा बंद कुठला राजकीय नाही. विकृतीच्या विरोधात आपण सुज्ञ नागरिकांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे. आपल्या घरी आई, बहीण लहान मुली आहेत. जेव्हा मुलींवर सामूहिक बलात्कार होतात. अशा वेळी नागरिकांनी पेटून उठलं पाहिजे, हे थांबलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले आहे कि दुपारी २ वाजेपर्यंत विकृतिच्या विरोधात बंद पळून निषेध करावा त्यांना आपण सहकार्य करावे. या बंदच्या विषयावरून व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, सचिव, तसेच कमिटीसोबत व्हॉइस कॉल वर मिटिंग घेतली. सगळ्यांनी एकमताने मत मांडले कि, २ वाजेपर्यंत बंद ठेवू. मी आपण सगळयांना विनंती करतो, पुणे शहरातील सर्व व्यापारी बंधूंची दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहतील. आणि या विकृतीचा कडकडीत निषेध करून बंद ठेवतील. कोणीही दुकाने उघसू नयेत. व्यापारी सुद्धा अशा घटनांच्या विरोधात असतात हे आपण दाखवून द्यायला हवे.