Positive Story | वयाच्या ३७ व्या वर्षी ‘ती’चा ठाम निर्धार; दोन मुलांसह स्वत:चाच झाली आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 12:56 PM2022-07-01T12:56:34+5:302022-07-01T12:56:45+5:30

कोरोनाकाळात पतीचे निधन झाले तरी ती डगमगली नाही...

At the age of 37 she was determined and became self-sufficient with two children | Positive Story | वयाच्या ३७ व्या वर्षी ‘ती’चा ठाम निर्धार; दोन मुलांसह स्वत:चाच झाली आधार

Positive Story | वयाच्या ३७ व्या वर्षी ‘ती’चा ठाम निर्धार; दोन मुलांसह स्वत:चाच झाली आधार

Next

- नारायण बडगुजर 

पिंपरी : सुखाचा संसार सुरू असताना कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊन पतीचे निधन झाले. कुटुंबातील कमावती व्यक्ती गेली. त्यामुळे दोन मुलांसह आयुष्य जगायचे कसे, असा प्रश्न होता. मात्र, ‘ती’ डगमगली नाही. दिवंगत पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘ती’ने वयाच्या ३७ व्या वर्षी शाळेत प्रवेश घेतला आणि ७०.६० टक्के गुणांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली.    

कोरोना महामारीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो कुटुंबांमधील कर्त्या व्यक्तींचे निधन झाले. यात अनेक महिला तरुणपणीच विधवा झाल्या. ऐन बहरात आलेला सुखी संसार उघड्यावर आला. त्यामुळे दोन वेळचे अन्न आणि जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ या विधवांवर आली. त्यात चिखली येथील त्रिवेणी नगर येथे वास्तव्यास असलेल्या विशाखा बनसोडे यादेखील आहेत. मुलुंड येथील माहेर असलेल्या विशाखा यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. हिंगोली जिल्ह्यातील केंद्रा बुद्रुक येथील समाधान बनसोडे यांच्याशी २००५ मध्ये विशाखा यांचा विवाह झाला. समाधान यांनी दहावीनंतर आयटीआय केला. त्यानंतर चाकण येथील एमआयडीसीत खासगी कंपनीत नोकरी केली. विशाखा आणि समाधान यांना दोन मुले झाली. त्यातील आदर्श हा सध्या नववीत तर आदित्य हा सातवीत शिकत आहे. पत्नी विशाखा यांनी देखील शिकावे, अशी पती समाधान यांची इच्छा होती.

दरम्यान, पती समाधान यांना एप्रिल २०२१ मध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला. सव्वा महिना रुग्णालयात उपचार केले. एप्रिलमध्येच त्यांच्या डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा होणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. रुग्णालयातील उपचाराच्या बिलाची ११ लाखांची रक्कम विशाखा यांच्या माहेरच्यांनी, कंपनीने, तसेच इतरांनी दिली. पतीचे अचानक निधन झाल्याने काय करावे, असा प्रश्न विशाखा यांच्यापुढे होता. मात्र, त्यांनी खचून न जाता पतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरविले.

विशाखा यांनी इयत्ता दहावीसाठी रात्र शाळेत प्रवेश घेतला. त्यांची कसरत होऊ लागली. रात्री दीड-दोनपर्यंत अभ्यास केला. अभ्यासात मुलगा आदर्श याने देखील मदत केली. स्वत:च्या पायावर उभे रहायचे आहे या जिद्दीच्या जोरावर त्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

‘खाकी’ची आवड

विशाखा यांना पोलिसांच्या वर्दीच्या खाकी रंगाचे आकर्षण आहे. आपण पोलीस व्हावे, असे त्यांना वाटायचे. मात्र, शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. ‘नर्सिंग’चे शिक्षण घेतले. त्यानंतर रुग्णालयात ऑपरेशन थिएटर असिस्टंट म्हणून नोकरी करावी, असे त्यांना वाटले. त्यासाठीचे शिक्षण नसल्याने अडचण झाली. तसेच मुलांचा अभ्यास घेण्यात देखील अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी त्यांनी पुन्हा शिकण्याचा पर्याय निवडला.

‘उमेद जागर’मुळे दिलासा

काेरोना महामारीमुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने उमेद जागर उपक्रम राबविला. यात विशाखा बनसोडे यांना सौंदर्य प्रसाधनांशी संबंधित प्रशिक्षण दिले. त्यामुळे विशाखा यांना मोठा दिलासा मिळाला.    

मी स्वत:च्या पायावर उभे रहावे, असे पतीला वाटायचे. त्यासाठी त्यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. तसेच कटलरीचा व्यवसाय सुरू करून दिला. मात्र पतीच्या निधनानंतर गाळ्याचे भाडे देणे शक्य नसल्याने दुकान बंद केले. स्वत:सह मुलांना सांभाळायचे म्हणून खचून न जाता दहावीची परीक्षा दिली. आणखी शिकायचे आहे. पतीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
- विशाखा बनसोडे, त्रिवेणीनगर, चिखली

Web Title: At the age of 37 she was determined and became self-sufficient with two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.