वयाच्या ७७ व्या वर्षी जेष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन
By श्रीकिशन काळे | Published: July 17, 2023 09:26 AM2023-07-17T09:26:00+5:302023-07-17T09:26:20+5:30
मंगलाताई या पुर्वाश्रमीच्या राजवाडे होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली.
पुणे: जेष्ठ गणितज्ज्ञ मंगला नारळीकर (वय७७) यांचे राहत्या घरी आज सकाळी निधन झाले. त्या जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत. त्या गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होत्या.
मंगलाताई या पुर्वाश्रमीच्या राजवाडे होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले. इ.स. १९६५ मध्ये त्यांचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याशी झाला. संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत होत्या.
डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत. त्यामध्ये A Cosmic Adventure (अनुवादित, मूळ मराठी - आकाशाशी जडले नाते, लेखक प्रा. जयंत नारळीकर), An easy Access to basic Mathematics (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक),
गणितगप्पा (भाग १, २), गणिताच्या सोप्या वाटा (शालेय विद्यार्थ्यांसाठीचे पुस्तक), नभात हसरे तारे (सहलेखक - डॉ. अजित केंभावी व डॉ. जयंत नारळीकर), खगोलविज्ञानविषक पुस्तक पहिलेले देश, भेटलेली माणसं (प्रवासवर्णन).