वयाच्या ८४ व्या वर्षी पतीला मिळणार पत्नीकडून पोटगी; राज्यातील पहिलेच प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 02:51 PM2022-06-25T14:51:43+5:302022-06-25T14:54:31+5:30
कौटुंबिक न्यायालयाचा आदेश
पुणे : आजवर कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला पोटगी दिल्याच्या घटना घडल्या. पण, एका प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने ७४ वर्षीय पत्नीला ८४ वर्षीय पतीला दरमहा २५ हजार रुपयांची अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. संसाराला ५५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २०१८ साली घटस्फोटाचा दावा दाखल केला. पतीच्या बाजूने एवढ्या मोठ्या रकमेची पोटगी देण्याचा आदेश दिल्याचे राज्यातील हे पहिलेच प्रकरण असल्याचा दावा अर्जदार पतीच्या वकील ॲड. वैशाली चांदणे यांनी केला आहे.
कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश राघवेंद्र आराध्ये यांनी हा निकाल दिला. ८४ वर्षीय अर्जदार तुकाराम आणि ७४ वर्षीय सुशीला (नावे बदललेली) यांनी हा दावा न्यायालयात दाखल केला आहे. दोघांचे १९६४ मध्ये लग्न झाले. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. तुकाराम हे एका शिक्षणसंस्थेचे संचालक, तर त्यांची पत्नी सुशीला संबंधित संस्थेच्या अध्यक्ष आहेत. पतीने संचालकपदाचा राजीनामा द्यावा तसेच संस्थेतून आणि घरातून निघून जावे म्हणून सुशीला यांच्याकडून त्यांना गेली अनेक वर्षे वारंवार त्रास दिला जात आहे. सुशीला यांना दुर्धर आजार झाला, तेव्हा तुकाराम यांनी तिची खूप काळजी घेतली. तिचा आजार पूर्णपणे बरा झाला. तिच्या आजारपणात तुकाराम यांनी तिची सर्वतोपरी काळजी घेतली. पत्नीकडून होणारा छळही त्यांनी प्रेमापोटी सहन केला. त्यांना घरात जेवण करायला ती मनाई करत असे.
अर्जदाराला मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांना वेळेवर जेवण आणि औषधे घ्यायची असतात. अशी परिस्थिती असतानाही पत्नीकडून त्यांची काहीच काळजी घेतली जात नव्हती, असे दाव्यात नमूद आहे. पत्नीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तुकाराम यांनी घटस्फोट मिळावा म्हणून दावा दाखल केला आहे. त्यात दोघांनी एकमेकांवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपदेखील केला आहे.