चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी.

By प्रशांत बिडवे | Published: April 7, 2023 01:20 PM2023-04-07T13:20:26+5:302023-04-07T13:20:51+5:30

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सहकाराच्या इतिहासावर केले संशाेधन

At the age of eighty the retired professor obtained Ph. D. | चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी.

चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी.

googlenewsNext

पुणे : काेणतेही काम अडले की माणूस वयाचा दाखला देत विषयाला बगल देताे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तळमळीतून सेवानिवृत्तीनंतर बारा वर्षांनी एका निवृत्त प्राध्यापकानेज्येष्ठ नागरिक काेट्यातून संशाेधनासाठी विद्यापीठात नाेंदणी केली आणि चक्क वयाच्या ऐंशीव्या वर्षी इतिहास या विषयात डाॅक्टर ऑफ फिलाॅसाॅफी ‘पीएच. डी.’ ही पदवी संपादित केली.

प्रा. डाॅ. वसंत गाेपाळराव ठाेंबरे (वय ८०, रा. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे पीएच. डी. पदवी संपादित केलेल्या ज्येष्ठ संशाेधकाचे नाव आहे. बी. ए. उत्तीर्ण झाल्यानंतर १९६५ साली तत्कालीन पुणे विद्यापीठात एम. ए. इतिहास वर्गात प्रवेश घेतला. विभागाच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी असल्याची आठवणही त्यांनी सांगितली. त्यानंतर वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात १९६८ ते २००३ या कालावधीत इतिहास विषयाचे अध्यापन केले. गंगापूर येथील मुक्तानंद काॅलेजमध्ये १९९४ ते १९९६ या काळात प्राचार्य म्हणून काम केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मनात कुतूहल हाेते. त्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी ज्या व्यक्तीने सहकाराच्या माध्यमातून देशात पहिल्यांदा प्रयत्न केले त्यांचा अभ्यास करणे तसेच सद्यस्थितीत या प्रश्नांवर काय उपाय शाेधता येतील का? या विचारातून हा विषय निवडला. ज्येष्ठ नागरिक काेट्यातून पीएच. डी.ची संधी उपलब्ध करून देत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१५ मध्ये निवड केली. ‘डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे सहकार क्षेत्रातील याेगदान : एक चिकित्सक अभ्यास १९०१ ते १९८०’ हा विषय संशाेधनासाठी घेतला. त्यासाठी डाॅ. ए. एस. विद्यासागर यांनी मार्गदर्शन केले. गत सात वर्षे संशाेधन करत संशाेधन प्रबंध सादर केला. दि. ५ एप्रिल २०२३ राेजी विद्यापीठाने पीएच. डी. पदवी बहाल केली.

डाॅ. ठाेंबरे म्हणाले, संशाेधनातून सहकार क्षेत्रात सुधारणेसाठी काही उपायही सांगितले आहेत. शेतकऱ्यांना ४ टक्के व्याजाने कर्ज द्यावे. पतसंस्थांची कर्ज बुडविणाऱ्यांवर कारवाई व्हावी. शेतीच्या मशागतीसाठी भाड्याने यंत्र पुरवावे, राज्यातील विक्री झालेल्या सहकारी कारखान्यांची केंद्राने चाैकशी करावी आणि पतसंस्थांना संजीवनी द्यावी.

भारतीय शेती मान्सूनचा जुगार

अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास केला. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारावर आयाेजित केलेल्या परिषदांची कागदपत्रेही अभ्यासली. भारत कृषिप्रधान देश आहे. मात्र, सिंचनात अपेक्षित वाढ झाली नाही. सिंचनासाठी हिमालय ते कन्याकुमारी असा कालवा तयार करावा, भारतीय शेती हा मान्सूनचा जुगार आहे आणि सहकार वाढविणे हाच त्यावर पर्याय आहे. सहकार टिकला तर शेतकरी, कामगार आणि समाजातील दुर्बल घटक जगेल. - डाॅ. वसंत ठाेंबरे, ज्येष्ठ संशाेधक

Web Title: At the age of eighty the retired professor obtained Ph. D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.