Winter Session Maharashtra: नववर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गारठणार; आठवडाभरात थंडीचा कडाका वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 12:45 PM2023-01-01T12:45:07+5:302023-01-01T12:45:33+5:30
सहा जानेवारीनंतर पुढील दोन आठवडे राज्याच्या काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता
पुणे : हिवाळा सुरू झाल्यावर अगदी दोन दिवसांचा अपवाद वगळता राज्यात तसेच पुण्यातही थंडीचा प्रभाव जाणवलाच नाही. मात्र, नववर्षाच्या सुरुवातीला गारठा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार येत्या आठवडाभरात किमान तापमानात घट होऊन गारठा वाढणार आहे. तर ६ जानेवारीनंतर पुढील दोन आठवडे राज्याच्या काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नवीन वर्षात थंडी पडणार ही ‘गुड न्यूज’ ठरावी.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारीनंतर दोन आठवड्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात किमान तपमान घसरण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे ही थंडीची लाट येऊ शकते. याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, ‘‘पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये ६ जानेवारीनंतर वातावरणात लक्षणीय बदल होऊ शकतो. संपूर्ण राज्यात सध्या वातावरण कोरडे असून, आर्द्रता कमी झाली आहे. तसेच आकाशही निरभ्र आहे. परिणामी किमान तपमानात घट होईल. बंगालच्या उपसागरावरून पूर्वेकडे वाहणारे वारेही कमी होतील. त्यामुळेही पश्चिम हिमालयीन पर्वतरांगांवरून येणारे उत्तरेकडील थंड वारे राज्यात पोहोचणार असल्याने थंडी वाढणार आहे.’’
पुण्यात फारसा प्रभाव नाही
नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात सरासरी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत असेल. पुण्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ वगळता हे तापमान २८ ते ३० अंशांदरम्यान असेल. तर ६ ते १३ दरम्यानच्या आठवड्यात किमान तापमान सुमारे ११ ते १२ अंश सेल्सिअस असेल. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यात तापमान १० अंशांपेक्षा खाली जाण्याचा अंदाज आहे. मात्र, पुण्यात गारठा वाढणार असला तरी थंडीच्या लाटेचा फार प्रभाव जाणवणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
गारठा वाढण्यास अनुकूल वातावरण
हिवाळा सुरू झाल्यानंतर अगदी दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता फारसा गारठा जाणवला नव्हता. याबाबत काश्यपी म्हणाले, ‘‘बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्वेकडे वारे वाहत होते. त्यामुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढले होते. काही प्रमाणात ढगाळ वातावरणही होते. त्यामुळे रात्री होणारे दीर्घ तरंग विकिरण पुरेशा प्रमाणात होत नव्हते. त्यामुळे गारठा वाढलेला नव्हता. आता ही परिस्थिती बदलणार आहे.’’