त्या प्रतिकुल परिस्थितीतही अटलजी स्वत: युध्दभूमीवर आले आणि.....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 05:13 PM2018-12-25T17:13:24+5:302018-12-25T17:19:49+5:30
जवानांशी फक्त संवादच साधला नाही तर शत्रूच्या पकडलेल्या जवानांचे त्यांनी अधिका-यांच्या बरोबरीने चौकशीही केले होते.
पुणे :कारगिल युद्ध हे सर्वात अवघड आणि आव्हानात्मक आणि तितकेच थरारक युद्धसुध्दा होते. या युद्धातील प्रतिकुल व खडतर प्रसंगी पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे प्रत्यक्ष कारगिलच्या युद्धभूमीवर आले होते. खरंतर त्यांचे येणे आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. त्यानंतर त्यांनी जवांनांशी संवाद साधला होता. आणि जवानांशी फक्त संवादच साधला नाही तर शत्रूच्या पकडलेल्या जवानांचे अधिका-यांच्या बरोबरीने इंट्रोगेशनही (चौकशीही) केले होते. या आठवणी याक्षणी सुध्दा अंगावर रोमांच उभे करतात, अशा शब्दांत खडकीच्या अपंग पुर्नवसन केंद्रातील जवानांनी वाजपेयी बद्दलच्या स्मृती जागवल्या.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज (दि. २५ डिसेंबर) जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून शिवाजीनगरचे आमदार विजय काळे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष चासकर,ज्येष्ठ सदस्य सुरेश कांबळे, शिक्षण समितीचे अध्यक्ष दुर्योधन भापकर आणि स्थानिक नगरसेविका कविता युद्धभूमीवर लढताना कायमचे जायबंदी झालेल्या जवानांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना फळांची भेटही दिली. यावेळी केंद्राचे वैद्यकिय संचालक कर्नल आर. के. मुखर्जी आणि त्यांचे अन्य अधिकारी तसेच भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात कोणतिही औपचारिकता नसल्याने स्वागतगीत, पाहुण्यांचा सत्कार, प्रास्ताविक, आभार या नेहमीच्या उपचारांना फाटा देण्यात आला होता हे या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यामुळेच जवानही जरा मनमोकळेपणाने बोलले.
कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले सेना मेडल विजेते मिलिटरी इंटेलिजन्सचे नाईक रमेश पुरी यांनी सुरूवात केली. ते म्हणाले, कारगिल सेक्टरमध्ये युद्धाचे ढग जमायला तेव्हा आपण पुण्यात कुटुंबासमावेत होतो. एक दिवस अचानक मला कारगिलला निघण्याचा संदेश आला आणि आपण तातडिने कारगिलकडे गेलो. मला द्रास सेक्टरमध्ये पाठवण्यात आले. हे युद्ध इतकं विचित्र अन विषम परिस्थितीतलं होतं की भारतीय सैन्य हे जमिनीवर आणि शत्रूचे सैनिक पहाडांवर. तेथून ते आपल्या सैन्याच्या हलचाली सहजपणे बघत होते आणि डावपेच आखत होते. तशातही आम्ही शत्रूच्या बातम्या काढायला सुरूवात केली.
युद्ध सुरू असताना एक दिवस अचानक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वत: युद्धभूमीवर येऊन सैनिकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या आगमनाने सैनिकांचा उत्साह वाढला. युद्धभूमीवर गोळीबार सुरू असल्याने पंतप्रधान वाजपेयी यांना आलमागेच आमच्या तळावर थांबवण्यात आले होते. तिथे आपल्या सैन्याने पकडलेले काही शत्रूचे सैनिक होते आणि अधिकारी त्यांची चौकशी करत होते. पंतप्रधान वाजपेयीजी तेथे चौकशीच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी स्वत: शत्रूच्या सैनिकांची चौकशी केली. त्यांच्याकडून लष्करी अधिका-यांच्या सारखी महिती मिळवण्यासाठी त्यांना प्रश्न विचारले. अर्थात युद्धभूमीवर पंतप्रधानांना फार काळ थांबून देणे योग्य नसल्याने त्यांना पुन्हा परत पाठवण्यात आले.
यावेळी काही जवानांनी प्रत्यक्ष युद्धाचाही आँखोदेखा हाल सांगून सर्वांना स्तिमित केले तर काही जवानांनी अणुस्फोटासारखी जगाला हदरवणारी कृती पंतप्रधान वाजपेयी यांनी करून देशाची मान जगात उंचावली आणि सैन्याचे, देशवासीयांचे मनोबल वाढवले असेही मोकळेपणाने सांगितले.