एटीएम कार्ड चोरून फसवणूक करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:19+5:302021-07-19T04:09:19+5:30
पुणे : ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम मशिनमध्ये चुकून विसरलेले कार्ड घेऊन त्याद्वारे खरेदी करून फसवणूक करणाऱ्यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली ...
पुणे : ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम मशिनमध्ये चुकून विसरलेले कार्ड घेऊन त्याद्वारे खरेदी करून फसवणूक करणाऱ्यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
श्रवण सतीश मिनजगी (वय २३, रा. कदमवस्ती, लोणी काळभोर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी एका ६० वर्षांच्या सेवानिवृत्ती ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे १४ जून रोजी दुपारी १२ वाजता वीर चाफेकर चौकातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पीननंबर जनरेटर करण्यासाठी गेले होते. त्यांना मशिनच्या स्क्रीनवर इनकरेक्ट पीन असा मेसेज दिसला म्हणून ते बँकेत चौकशी करायला गेले. त्या गडबडीत त्यांचे एटीएम कार्ड मशिनमध्येच राहिले. ते तातडीने परत आले तर त्यांना कार्ड मिळाले नाही. त्यांच्या मागे उभा असलेल्या श्रवण मिनजगी याने ते कार्ड चोरून त्याद्वारे एटीएमद्वारे रोकड काढून तसेच सोने खरेदी करून ६१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.
शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले. सरकारी वकील मैथिली काळवीट यांनी सांगितले की, आरोपीकडून एटीएम कार्ड जप्त करायचे आहे. तसेच सोने खरेदी केले, त्याचा पुरावा गोळा करायचा आहे. न्यायालयाने आरोपीला २ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली.