जिल्ह्यातील एटीएम केंद्रे सुरळीत होईनात
By admin | Published: May 13, 2017 04:20 AM2017-05-13T04:20:37+5:302017-05-13T04:20:37+5:30
शहरात जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांच्या शाखा आहेत. नोटाबंदीनंतर बँकांचे एटीएम केंद्र सुरळीत झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शहरात जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांच्या शाखा आहेत. नोटाबंदीनंतर बँकांचे एटीएम केंद्र सुरळीत झाले. परंतु, मागील महिनाभरापासून अनेक एटीएम केंद्रे शनिवारी, रविवारी ‘शटर बंद’ अवस्थेत असतात. त्यामुळे सुटीच्या काळात ग्राहकांना तत्काळ पैसे उपलब्ध होत नाहीत. आज याबाबत पाहणी केली असता शहरातील बँक आॅफ इंडियाचे एटीएम केंद्र बंद अवस्थेत आढळले. तर महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्रच
पूर्वीच्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील ग्राहकांची नाराजी आहे. विशेषत: महाराष्ट्र बँकेचे एटीएम केंद्र सतत बंद असते. सुट्या जोडून आल्यास अनेक एटीएम केंद्रांवर चलनच नसल्याचे आढळून येते.
रोख रक मेचा तुटवडा असल्याने एटीएम बंद असल्याचे बँक आॅफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. तर बँक आॅफ महाराष्ट्राचे शहरातील एटीएम स्थलांतरित केल्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम वगळता बहुतांश एटीएम यंत्रणा सलाईनवर होती.
सुमारे दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर बंद असलेले एटीएम सुरळीत झाले. अद्यापपर्यंत हे एटीएम बंद न राहता सुरळीत सुरू आहेत. युको बँक, सेंट्रल बँक आॅफ इंंडियाचे एटीएम काही दिवसांपासून बंद असल्याचे चित्र आहे. सध्या हे दोन्ही एटीएम सुरू झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय दूर झाली आहे.
शहरातील भिगवण रस्त्यालगतचे बँक आॅफ इंडियाचे एटीएम गेल्या ३ ते ४ दिवसांपासून बंद आहे. ‘कॅश’च्या तुटवड्यामुळे हे एटीएम बंद राहत आहेत. या बँकेची शहर आणि तालुक्यात एकूण ५ एटीएम आहेत.
या सर्व एटीएमला बारामतीच्याच शाखेतून चलनपुरवठा केला जातो. सध्या चलनतुटवड्यामुळे एटीएम बंद आहे. सोमवारी (दि. १५) एटीएम पूर्ववत सुुरू होतील, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले, तर शहरात सध्या रोख रकमेचा कोणताही तुटवडा नाही, एटीएमसाठी मागणीप्रमाणे रोख रक्कम पुरविली जात आहे. रक्कम तुटवड्यामुळे एटीएम बंद राहत असल्याची कोणतीही तक्रार नाही, असे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले. बँक आॅफ महाराष्ट्रचे शहरातील सिनेमा रस्त्यावरील एटीएम बंद करण्यात आले आहे. हे एटीएम जळोची हद्दीत स्थलांतरित करण्यात आले आहे.
शहरात एटीएम सुरू असतानादेखील सतत बंद राहत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी होत्या. आता हे एटीएम मुख्य शहर परिसराबाहेर गेल्याने ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या बँकेच्या ग्राहकांची शहरात अधिक संख्या आहे. नाईलाजास्तव या ग्राहकांना इतर बँक एटीएमचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे अधिक वेळा इतर बँकांच्या एटीएमचा वापर केल्यास नाहक भुर्दंड सोसावा
लागत आहे. त्यामुळे बँक आॅफ महाराष्ट्रच्या ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजगुरूनगरला
‘नो कॅश’चा फलक
लोकमत न्यूज नेटवर्क
दावडी : राजगुरुनगर शहरात असलेल्या जवळपास सर्वच बँकांच्या एटीएम मशीनमध्ये कॅश मिळत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. राजगुरुनगर शहरात असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, बँक आॅफ बडोदा, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स आदी सरकारी बँकांबरोबर एचडीएफसी बँक आदी बँका आहेत. शासन पुरस्कृत बँकांकडे पुरेशी रक्कम रिझर्व्ह बँक देत नसल्यामुळे जनतेमध्ये पैशाची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. एटीएममध्ये जास्त पैसे टाकण्यात येत नसल्याने आणि सर्वच ग्राहकांना वेळेत बँकेत जाता येत नसल्याने आपल्या हक्काचे पैसे खात्यात असूनही ते काढता येत नाहीत.