'बंटी बबली'ची करामत ; चार 'एटीएम हॅक करुन तब्बल १० लाखांना चुना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 07:20 PM2021-03-27T19:20:07+5:302021-03-27T19:21:27+5:30
तांत्रिक त्रुटीचा घेतला गैरफायदा....
पुणे : एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये तुम्ही कार्ड टाकून पाहिजे तेवढ्या पैशांची एंट्री केली की, तेवढेच पैसे तुम्हाला मिळतात. पण एका आधुनिक बंटी बबलीने हे एटीएम मशीनच हॅक करुन १ हजार रुपयांच्या ५० ट्राँझेशनद्वारे तब्बल १० लाख रुपये काढून बँकेला चुना लावल्याचे समोर आले आहे. अशाच प्रकारे त्यांनी शिवाजीनगर येथील कॅनरा बँकेच्याच एका एटीएम सेंटरमधून ५ लाख रुपये काढले होते. तसेच विमाननगर व धायरी येथील एटीएममधून त्यांनी काही हजार रुपये लंपास केले आहेत.
शिवाजीनगर येथील स्नेहा सेंटरमधील कॅनरा बँकेच्या एटीएममधून या दुकलीने १८ मार्च रोजी ५ लाख रुपये काढून फसवणूक केली होती. त्याचप्रकारे त्यांनी आदल्या दिवशी १७ मार्च रोजी मार्केटयार्ड येथील प्रवेशद्वार क्रमांक ४ येथे असलेल्या कॅनरा बँकेच्या एटीएम मशीनमधून १० लाख रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे.
कॅनरा बँकेचे मुख्य कार्यालय बंगळुरु येथे आहे. बंगळुरुच्या कार्यालयातून पुण्यातील मुख्य कार्यालयात १७ मार्च रोजी मार्केटयार्ड येथील एटीएम केंद्रावर संशयास्पद व्यवहार झाल्याचा ई मेल आला. त्यानंतर बँकेचे सुरक्षा अधिकार्यांनी एटीएम केंद्रावर धाव घेतली. त्यांनी त्या दिवशीचे व्यवहार तपासले. या एटीएम सेंटरमध्ये आदल्या दिवशी १७ लाख रुपये भरले होते. पण त्यापैकी १० लाख रुपये काढल्याची नोंदच झाली नसल्याचे आढळून आले. त्यांनी एटीएम केंद्रामधील सीसीटीव्ही पाहिले असता त्यांना एक महिला व पुरुष यांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका तासाभराच्या आत १० लाख रुपये काढून नेल्याचे दिसून आले.
या प्रकरणी शेकू देह राठोड यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कॅनरा बँकेच्या मार्केटयार्ड येथील एटीएम सेंटरमध्ये १७ मार्चला रात्री १० वाजता एक पुरुष व महिला आले. पुरुषाच्या पाठीवर सॅक होती. त्याने सॅकमधून काही तरी वस्तु काढून ती एटीएम मशीनच पाठीमागे गेला. त्यानंतर त्याने मशीनमध्ये एक कार्ड टाकले. त्यानंतर लागोपाठ ५० ट्रान्झेक्शन करुन तब्बल १० लाख रुपये काढून ते दोघे पसार झाले.
अशी केली चोरी
या सायबर चोरट्यांनी एटीएम मशीनच्या पाठीमागील बाजूला काही तरी वस्तू लावली. त्याद्वारे त्याने मशीन हॅक केले. त्यानंतर त्याने एक कार्ड मशीनमध्ये टाकले. त्याच्यावर १ हजार रुपयांची ट्रान्झेक्शन केले. त्याचवेळी तो मोबाईलवर काहीतरी करीत होता. त्यामुळे मशीनमधून पाचशेच्या दोन नोटा बाहेर येण्याऐवजी ४० नोटा येत होत्या. अशाप्रकारे त्याने एका पाठोपाठ ५० व्यवहार केले. प्रत्येक वेळी १ हजार रुपयांऐवजी २० हजार रुपयांच्या नोटा बाहेर येत होत्या. मात्र, त्याची कोठेही नोंद होत नव्हती.
शिवाजीनगर येथील एटीएम सेंटरमध्येही त्याने याच कार्डचा वापर करुन ५ लाख रुपये काढले होते. तसाच प्रयत्न त्याने विमाननगर आणि धायरी येथील एटीएम सेंटरमध्ये करुन पाहिला होता. मात्र, या दोन सेंटरमधील मशीनमधून अशा प्रकारे ५०० रुपयांच्या २ नोटांऐवजी २० नोटा बाहेर आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पुढे फसवणुकीचा प्रयत्न केला नाही.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक एस. पी. शिंदे यांनी सांगितले की, या दोघा चोरट्यांनी तोंड झाकले असल्याने त्यांचे चेहरे ओळखू येत नाही. त्यांनी एटीएम मशीनच्या पाठीमागील बाजूला काही तरी वस्तू लावली होती. तसेच ते मोबाईलवरुन मशीन ऑपरेट करताना दिसून येत आहे.
एटीएम मशीन बंद करुन पैसे काढण्याचा एक प्रकार यापूर्वी चोरट्यांकडून वापरला जात होता. आता चक्क एटीएम मशीन हॅक केल्याचा प्रकार समोर येत आहे. त्याचा तपास करायचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून बँकांनाही आपल्या तांत्रिक बाजू आणखी भक्कम कराव्या लागणार आहेत.