मनात अस्वस्थता जाणावण्याइतपत वातावरण गढूळ: लक्ष्मीकांत देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:09 AM2021-01-09T04:09:30+5:302021-01-09T04:09:30+5:30
पुणेः लोकशाही मुल्ये स्वीकारून सत्तर वर्षे झाली तरीसुद्धा परिवर्तन झाले, असे आपण म्हणू शकत नाही. कारण डॉ. बाबासाहेब ...
पुणेः लोकशाही मुल्ये स्वीकारून सत्तर वर्षे झाली तरीसुद्धा परिवर्तन झाले, असे आपण म्हणू शकत नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधनारुपी जो ग्रंथ दिला, त्या ग्रंथातील समानता आणि बंधुता ही मूल्ये आपण विसरलो आहोत. हिंदू-मुस्लिमांची दरी वाढत चालली आहे. मतांच्या राजकारणासाठी जाणीवपू्र्वक हिंदू-मुस्लीम धृवीकरण केले जात आहे. त्यामुळे समाजात एकरूपता येण्यात अडथळे येत आहेत. आजही मनामनात अस्वस्थता जाणवण्याइतपत वातावरण गढूळ झाले असल्याची खंत साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.
जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित दोन दिवसीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज झाले, त्यावेळी या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून देशमुख बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, संघबोधी बंदे, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य रवींद्र दळवी, भारती सहकारी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब कड, नगरसेवक महेश वाबळे, कामगार नेते महेश शिंदे, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा संगीता चोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी भारती विद्यापीठाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. आनंदराव पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, लोकशाहीनंतर गरिबी हटली पाहिजे, हे स्वप्न आपण पाहिले होते. परंतु परिवर्तनाचे ते स्वप्न भग्न पावत आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. कायद्याने चातुर्वण्य व्यवस्था आणि जाती व्यवस्था अस्तित्वात नसली तरी लोकांच्या डोक्यातील जातींची समीकरणे आजही संपलेली नाहीत.
यावेळी अशोक वानखेडे, रवींद्र दळवी, भाऊसाहेब कड, महेश वाबळे, महेश शिंदे, संगीता चोरे यांनी मनोगत व्यक्त केले. जनसेवा व्यक्तिविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश धिवार यांनी प्रास्ताविक केले.
........