विद्यापीठाचे वातावरणही झाले विठ्ठलमय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:20+5:302021-07-21T04:10:20+5:30
पुणे : ‘अबिर गुलाल उधळीत रंग’..., ‘कानडा राजा पंढरीचा ’..., ‘अमृताची फळे, अमृताची वेल’... या अभंगांचे भक्तीपूर्ण सादरीकरण..., श्रवणाचा ...
पुणे : ‘अबिर गुलाल उधळीत रंग’..., ‘कानडा राजा पंढरीचा ’..., ‘अमृताची फळे, अमृताची वेल’... या अभंगांचे भक्तीपूर्ण सादरीकरण..., श्रवणाचा आनंद आणि आषाढी एकादशी निमित्ताने पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाची पर्वणी यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वातावरण मंगळवारी विठ्ठलमय झाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीला ''वारी ज्ञान पंढरीची'' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार,व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. संजय चाकणे, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, डॉ. संजीव सोनवणे, नवोपक्रम - नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ.अपूर्वा पालकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, प्राचार्य पंडित शेळके, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात हर्षद गोळे, शीतल गद्रे , अभयसिंह वाघचौरे यांनी रोहित नागरे, सिद्धेश व ऋषिकेश उंडाळकर यांच्या साथ-संगतीने संत तुकाराम, चोखामेळा, नामदेव आणि तुकडोजी महाराजांच्या अभंगांचे सादरीकरण केले. तर दुस-या सत्रात पं. शौनक अभिषेकी यांनी ‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी’ हा अभंग सादर केला. त्यांनी गायलेल्या बा.भ.बोरकर यांच्या ''नाही पुण्यांची मोजणी, नाही पापाची टोचणी'' या रचनेला उपस्थितांनी विशेष दाद दिली. अभिनेता व निवेदक राहूल सोलापूरकर यांनी या कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले.
-------------------------