एटीएमएस सिग्नल यंत्रणा निरुपयोगी, वाढती वाहतूक कोंडी, पुणे पोलिसांचे महापालिकेला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 09:19 AM2024-11-27T09:19:52+5:302024-11-27T09:21:12+5:30
एटीएमएस सिग्नलन यंत्रणेचे प्रणालीचे काम सुधारल्याशिवाय संबंधित कंपनीला उर्वरित पैसे देऊ नये
पुणे: महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करत बसविलेली अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एटीएमएस) ही सिग्नल यंत्रणा निरुपयोगी आणि वाहतूक कोंडी वाढवत आहे. त्यामुळे या प्रणालीचे काम सुधारल्याशिवाय संबंधित कंपनीला उर्वरित पैसे देऊ नये, असे पत्र पुणे पोलिसांनी महापालिकेला पाठवले आहे.
पुण्यातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी कंपनीने ‘एटीएमएस’ सिस्टम बसविण्यासाठी २०१८ मध्ये निविदा काढल्या होत्या. पहिल्या टप्प्यात २६१ चौकांपैकी १२५ चौकांमधील सिग्नल एकमेकांशी जोडून आधुनिक यंत्रणेने नियंत्रित करण्यात येणार आहेत. या ट्रॅफिक सिस्टमसाठी १०२ कोटी आणि देखभाल-दुरुस्तीसाठी ५८ कोटी खर्चाच्या निविदेला पालिकेने मान्यता दिली होती.
या आधुनिक संगणकीय प्रणालीमुळे प्रवासाला लागणारा वेळ कमी होईल, नेटवर्क सरासरीची गती वाढेल, स्टॉपवरील प्रतीक्षा कमी होईल, ग्रीन वेव्ह (पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन गाड्या, फायर, बीआरटी) वापरून आपत्कालीन स्थितीत व्यवस्थापकीय करण्यास अनुमती देता येईल. त्यामुळे प्रवास वेळेची विश्वासार्हता सुधारता येईल, प्रवासाचा अंदाज येईल, ट्रॅफिक सिग्नलची कार्यक्षमता वाढेल, सुरक्षितता वाढेल, शहरातील प्रदूषण पातळीत घट होईल आणि शहरभर वाहतुकीची माहिती सामाईक करण्यासाठी डेटा प्लॅटफॉर्म तयार करता येईल, असे निविदा मंजूर करताना सांगण्यात आले होते; पण प्रत्यक्षात असे काही घडले नाही. त्यामुळे पुणे पोलिसांनी अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एटीएमएस) ही बसवलेली सिग्नल यंत्रणा निरुपयोगी आणि वाहतूक कोंडी वाढवत आहे. त्यामुळे या प्रणालीचे काम सुधारल्याशिवाय संबंधित कंपनीला उर्वरित पैसे देऊ नये, असे पत्र पालिकेला पाठविले आहे.
एका सिग्नलची किंमत ८१ लाख
‘अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’(एटीएमएस)अंतर्गत बसविण्यात येणाऱ्या १२५ सिग्नलसाठी १०२ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे एका सिग्नलची किंमत ८१ लाख रुपये झाली आहे.