एटीम पळवले; मात्र रक्कम चोरताच आली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:45+5:302021-05-22T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : जेजुरी अ ौद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम चोरट्यांनी दोरखंड बांधून गुरुवारी (दि.२१) रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : जेजुरी अ ौद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम चोरट्यांनी दोरखंड बांधून गुरुवारी (दि.२१) रात्री पळवले. मात्र, एटीएममधील पैशांची पेटीच त्यांना फोडता न आल्याने ती तेथेच टाकून चोरटे फरार झाले. दुसऱ्या दिवशी जेजुरी पोलिसांनी चोरट्यांचा शाेध घेत फोडलेले एटीएम आढळले. तसेच त्यातील २५ लाख रुपयांची रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली.
जेजुरी एमआयडीसी परिसरात बँक ऑफ महाराष्ट्रने एटीएम व्यवस्था सुरू केली आहे. गुरुवारी (दि.२१) मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम मशिनला दोरखंडाने बांधून वाहनाने ओढत नेऊन ते पळवले. ही घटना सकाळी कळल्यावर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पथकासह घटनास्थळी पोहचले. मात्र, एटीएममध्ये सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचा माग काढणे कठीण झाले. पोलिसांनीही याची तातडीने दखल घेत चोरट्यांचा माग काढण्यासाठी चार पथकांची स्थापना केली. जेजुरी एमआयडीसीपासून तीन किलोमीटरवर अंतरावर दौंडज रस्त्यावर पोलीस कर्मचारी धर्मवीर खांडे, हवालदार कारंडे यांना एटीएम मशिनचे नट बोल्ट सापडले. थोडे पुढे गेले असता हार्ड डिस्क सापडली. याची माहिती त्यांनी पोलीस पथकाला दिली. याच मार्गावर पुढे शोध घेतला असता एका निर्जन ठिकाणी रेल्वेचे काम सुरू असलेल्या दगडात लपवून ठेवलेली एटीएम मशिनची पेटी त्यांना आढळली. मशिनची पेटी चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र ती पेटी फुटली नाही. यामुळे चोरट्यांनी पेटी लपवून फरार झाले. पोलिसांनी जेसीबीच्या साहायाने पेटी बाजूला घेतली. यावेळी एटीएम वेंडरच्या लोकांना बोलावून ही पेटी उघडण्यात आली. यातील २४ लाख ८८ हजार रुपये सुरक्षित सापडले. उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, हवालदार नंदकुमार पिंगळे, कारंडे, धर्मवीर खांडे, गणेश कुतवळ, अक्षय यादव, प्रवीण शेंडे, प्रशांत पवार, संजय धुमाळ यांनी कसून तपास करून चोरीला गेलेले एटीएम शोधून काढले. चोरट्यांचे धागेदोरे हाती मिळाले असून लवकरच त्यांना ताब्यात घेईल जाईल, असे महाडिक यांनी सांगितले.
फोटो: हार्ड डिस्क तसेच एटीएम कॅश बॉक्स