अत्रे यांचे सोपे-उत्स्फूर्त लिखाण आजही वाचकप्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 06:00 AM2019-06-13T06:00:04+5:302019-06-13T06:01:08+5:30
साहित्यिक द. मा. मिरासदार : आचार्य अत्रेंच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्त साधला संवाद
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : ‘विनोदी साहित्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात आचार्य अत्रे यांचे मोलाचे योगदान आहे. अत्रे म्हणजे विनोदाचा धबधबा होते. पिढ्या बदलल्या तरी मनुष्याचा स्वभाव बदलत नाही, ही नस आचार्य अत्रेंनी बरोबर ओळखली होती. त्यांचे लिखाण सहजसोपे, उत्स्फुर्त असल्याने आजही वाचकांना आपलेसे वाटते,’ या शब्दांत ज्येष्ठ विनोदी साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी प्रल्हाद केशव अत्रे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
आचार्य अत्रे यांच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त ‘लोकमत’ने ब्याण्णव वर्षिय द. मा. यांच्याशी संवाद साधला. या वेळी द. मा. म्हणाले, आचार्य अत्रेंनी लेखनात कमालीचे वैविध्य जपले. त्यांनी कवितेपासून सुरुवात केली आणि नंतर विडंबनाकडे वळले. गडकरी यांच्यानंतर उत्तम नाटककार रंगभूमीला मिळाला नव्हता. अत्रेंनी रंगभूमीवरील ही उणीव भरुन काढली. एकदा बालमोहन नाटक मंडळीचे दामूअण्णा जोशी अत्रेंकडे आले. ते म्हणाले, ‘अत्रे, लोकांना नाटकामध्ये नवं काहीतरी हवं आहे. बघा प्रयत्न करु.’ अत्रे शाळेमध्ये मुख्याध्यापक होते. त्यांनी मुलांसाठी एक-दोन नाटकं लिहिली होती. जोशींच्या विनंतीनंतर त्यांनी लिहिलेले पहिले नाटक म्हणजे ‘साष्टांग नमस्कार’! हे नाटक विडंबनात्मक होते. औंधचे राजे त्या वेळी या नाटकाचा प्रचार करत असत. संस्थानात त्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ हा उत्तम व्यायाम आहे, असे सांगत असत. त्यांची थट्टा करण्यासाठी आचार्य अत्रेंनी हे नाटक लिहिले. त्यातील रावबहादूर हे पात्र खूप गाजले.
सर्वसामान्यांसाठीचा विनोद अत्रेंकडून शिकलो
‘मला कॉलेजला असल्यापासून आचार्य अत्रेंचे प्रचंड आकर्षण होते. बीएचे शिक्षण घेताना प्राध्यापक वाटवे आम्हाला अत्रे यांच्या खंडाळयातील बंगल्यावर घेऊन गेले होते. तेव्हा त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांची खूप भाषणेही मी ऐकली. अत्रेंचे नाटक, चित्रपट, साहित्य यांवर मी स्वतंत्रपणे व्याख्याने दिली आहेत. सामान्य लोकांनाही कळेल, असा विनोद असावा, हे मी अत्रेंकडून शिकलो.’ - द. मा. मिरासदार