परिचितांकडूनच होत आहेत महिलांवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:33+5:302021-03-16T04:11:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षी देशभरात काही महिने लॉकडाऊन होते. त्या काळात सर्वच गुन्ह्यांमध्ये घट झाली ...

Atrocities against women are being perpetrated by acquaintances | परिचितांकडूनच होत आहेत महिलांवर अत्याचार

परिचितांकडूनच होत आहेत महिलांवर अत्याचार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या वर्षी देशभरात काही महिने लॉकडाऊन होते. त्या काळात सर्वच गुन्ह्यांमध्ये घट झाली होती. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातही घट झाल्याचे दिसून येत असले, तरी अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत ही घट कमी आहे. त्याचबरोबर, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात बहुसंख्य गुन्ह्यांमध्ये परिचितांकडूनच अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

गेल्या वर्षी २०२० मध्ये बलात्काराच्या १६० गुन्हे दाखल झाले होते. २०१९ मध्ये असे २२४ गुन्हे दाखल झाले होते. त्याचबरोबर, २०२० मध्ये विनयभंगाच्या २६६ घटना घडल्या असून, २०१९ मध्ये ४१९ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. त्याचप्रमाणे, या काळात विवाहितेच्या छळवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

महिलांसाठी पोलीस आयुक्तालयाकडून हेल्पलाइन, बडी कॉप, भरोसा सेल, महिला कक्ष कार्यान्वित केले आहे, तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यांमध्ये महिला दक्षता समिती स्थापन केली आहे. एखादी महिला तक्रार घेऊन आल्यास, तिची तक्रार दक्षता समिती सदस्याच्या उपस्थितीत व महिला पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश आहेत. त्याबरोबर, महिलांविषयक गुन्ह्यांचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे प्रामुख्याने देण्यात येतो. त्यामुळे तक्रार महिला आपली तक्रार अधिक सुस्पष्टपणे महिला अधिकाऱ्यांकडे मांडू शकते.

अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अगदी घरामध्येही अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे अनेकदा जाणवते. लहान मुलींना कधी चॉकलेटचे आमिष दाखवून, तसेच घरात एकटीला पाहून तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचे प्रकार प्रामुख्याने घराजवळील ज्येष्ठ, तरुणांवरून झाल्याचे काही प्रकरणात दिसून येते. पूर्वी अशा घटना या पुढे येत नसत. आता त्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

तरुण वयात एकमेकांच्या आकर्षणातून दोघांचा परस्पर संमतीने शरीरसंबंध येतो. अनेकदा प्रेमप्रकरणातून ते जवळ आलेले असतात. पुढे काही कारणामुळे त्यांच्यात वाद होतात. अशा वेळी जर तरुणाने नकार दिला, तर बहुतांश वेळी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरात असल्याने, घरातील स्त्रीवर कामाचा खूप भार पडला होता. त्यातूनच घरात कुरबुरी वाढल्या. विवाहितेच्या छळामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अन्य गुन्ह्यांमध्ये ज्या प्रमाणात घट झाली, हे पाहता उलट विवाहितेला क्रूर वागणूक देण्याच्या घटनांमध्ये वाढच झाल्याचे दिसते.

- गुन्हा २०२० २०१९

बलात्कार १६० २२४

विनयभंग २६६ ४१९

विवाहितेला क्रूर वागणूक देणे २६२ २७२

Web Title: Atrocities against women are being perpetrated by acquaintances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.