‘ट्रूथ अँड डेअर’च्या नावाखाली अत्याचार; रावेतमधील धक्कादायक घटना

By प्रकाश गायकर | Updated: January 24, 2025 16:43 IST2025-01-24T16:42:52+5:302025-01-24T16:43:52+5:30

हॉस्टेलवर राहयला आलेल्या रीलस्टारमुळे घडला प्रकार 

Atrocities committed in the name of Truth and Dare Shocking incident in Ravet | ‘ट्रूथ अँड डेअर’च्या नावाखाली अत्याचार; रावेतमधील धक्कादायक घटना

‘ट्रूथ अँड डेअर’च्या नावाखाली अत्याचार; रावेतमधील धक्कादायक घटना

पिंपरी : एका १७ वर्षीय मुलीवर २८ वर्षीय तरुणाने घरातील बाथरुममध्ये अत्याचार केला असल्याचा प्रकार रावेत परिसरात उघडकीस आला आहे. पीडित मुलगी, तिची मैत्रीण आणि आरोपी हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते. मद्यप्राशन केल्यावर मंगळवारी (दि. २१) मध्यरात्री ते पहाटे हा प्रकार घडला. 

आयुष आनंद भोईटे (२० रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), सुशील बालन्‍द्र ठाकूर (२२ रा. बापदेवनगर, देहूरोड), रितिक संजय सिंग (२५, रा. बापदेवनगर, देहूरोड) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भोईटे याने सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरा वर्षीय पीडित मूळची राजगुरुनगर येथील असून ती नीट (एनईईटी) परीक्षेची तयारी करण्यासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात भाडेतत्त्वावर राहते. पाच वर्षांपूर्वी तिची पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका रीलस्टार मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. रीलस्टार मुलीचे आईशी पटत नसल्याने ती पीडित मुलीच्या हॉस्टेलवर एक दिवस राहण्यासाठी आली. विशेष म्हणजे या दोघी मागील पाच वर्षांत कधीच एकमेकींना भेटलेल्या नव्हत्या. रीलस्टार मुलगी पीडित मुलीच्या हॉस्टेलवर आल्यानंतर तिने आपल्या आईला फोन करून मी संत तुकारामनगर येथे आली आहे दुसऱ्या दिवशी माझे शूटिंग उरकले की मी घरी येईन, असे सांगितले होते.

 याच दरम्यान इंस्टाग्रामच्या माध्यमातूनच संशयित आरोपी भोईटे याच्याबरोबर काही वर्षांपूर्वी रीलस्टार मुलीची ओळख झाली होती. पीडित मुलीला मी मित्राकडे जाऊन येते, असे सांगून संबंधित रीलस्टार रावेत येथे गेली. तेव्हा भोईटे आणि संबंधित रीलस्टारने मद्यप्राशन केले. मध्यरात्रीपर्यंत ही मैत्रीण परत न आल्याने पीडितेने तिला फोन करून हॉस्टेलवर कधी येणार याची विचारणा केली. मात्र, तूच पार्टीसाठी इकडे ये असे तिला सांगितले. त्यानंतर पीडितेने पाठवलेल्या लोकेशनवर जाऊन सुशील आणि रितिक या दोघांनी पीडितेला कारमध्ये बसवून रावेत येथे आणले. रावेत येथे आल्यानंतर पीडित, रीलस्टार आणि आरोपींनी पुन्हा मद्यप्राशन केले. सर्वांनी मद्य प्राशन केल्यानंतर ‘ट्रूथ अँड डेअर’ खेळायला सुरुवात केली. त्यातच आरोपीने पीडितेशी जवळीक साधत अत्याचार केला. 
 
चुकून फोन लागल्याने प्रकार उघड 
आरोपी भोईटे याने प्रथम रीलस्टारबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्याने पीडित मुलीला फ्लॅटमधील एका स्वच्छतागृहात नेत तेथे तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडत असताना पीडितेच्या मोबाईलवरून तिच्या एका नातेवाईकाला फोन लागला. फोन सुरू असल्याचे पीडितेला आणि आरोपीला लक्षात आले नाही. संबंधित नातेवाईकाने हा प्रकार पीडित मुलीच्या आई-वडिलांना कळवला. नातेवाईकाने धक्कादायक माहिती सांगितल्यावर पहाटेच्या सुमारास पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पिंपरी-चिंचवडमध्ये धाव घेतली. 
 
‘ट्रूथ अँड डेअर’ने आयुष्यभराची सजा
ट्रूथ अँड डेअर’ या खेळामध्ये जसा समोरचा सांगेल तसे करायचे असते. यामध्ये पिडीतेच्या मैत्रिणीला दोन मित्रांनी चुंबन घ्यायला सांगितले. असे बराच वेळ झाल्यानंतर आरोपींनी तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी भोईटे याने पीडितेला बाथरुममध्ये नेत अत्याचार केला. 

पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक माहितीच्या आधारावर सर्व आरोपींची नावे निष्पन्न केली. त्याचबरोबर संबंधित रीलस्टार मुलीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. या सर्व प्रकारानंतर रात्री उशिरा तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये रावेत पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  - नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक  

Web Title: Atrocities committed in the name of Truth and Dare Shocking incident in Ravet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.