शिवसेना पर्वती विभागप्रमुख सूरज लोखंडेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 09:34 AM2022-11-03T09:34:15+5:302022-11-03T09:34:15+5:30
दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
पुणे : घराची कागदपत्रे पतसंस्थेत आणून दे नाही तर तुझ्या मुलाचा खून करतो, अशी धमकी देऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना पर्वती विभागप्रमुख सूरज लोखंडे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ५८ वर्षांच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी यांनी २०११ मध्ये सूरज लोखंडे याच्याकडून दीड लाख रुपये सात टक्के व्याजाने घेतले होते. ते दरमहा १० हजार रुपये व्याजापोटी देत होते. आठ वर्षांत १२ लाख रुपये दिले. तरीही मुद्दल बाकी असल्याचे सांगून सूरज वारंवार पैसे मागून धमकी देत होता. सहा महिन्यांपूर्वी सूरज लोखंडे हा फिर्यादी यांना एका पतसंस्थेत घेऊन जाऊन त्यांच्या नावावर तीन लाख रुपयांचे कर्ज काढले. त्यासाठी तो फिर्यादी यांच्याकडे तारण म्हणून घराची कागदपत्रे मागत होता. ती त्यांनी न दिल्याने जातिवाचक शिवीगाळ करून मुलाचा खून करतो, अशी धमकी दिली होती.
सूरज याच्या दहशतीमुळे त्यांनी इतके दिवस फिर्याद दिली नव्हती. दत्तवाडी पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार तपास करीत आहेत.