माझ्यावरील अॅट्रोसिटी खोटी : श्रीपाल सबनीस; म. सु. पगारे यांच्यावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:14 PM2018-02-09T18:14:04+5:302018-02-09T18:17:43+5:30
ही अॅट्रोसिटी खोटी असल्याचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी स्पष्ट केले आहे. रागाच्या भरात उचललेले हे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
पुणे : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी प्राध्यापकाच्या प्रमोशनासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर राज्यपाल, मुख्यमंत्री, डीवायएसपी, शिक्षण संचालक यांना मी निवेदन पाठविले. त्यावर चौकशी झाली. विद्यापीठाची फसवणूक केल्यामुळे त्याचा प्राध्यापकीचा पगार रद्द झाला. त्याचाच राग मनात धरून त्याने अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ही अॅट्रोसिटी खोटी असल्याचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी स्पष्ट केले.
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह विद्यापीठाचे कुलसचिव बी. बी. पाटील, उच्चशिक्षण सहसंचालक केशव तुपे, पुणे येथील उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने या चार जणांविरूद्ध पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी विचारले असता ही अॅट्रोसिटी खोटी असून, रागाच्या भरात उचललेले हे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
न्यायालयासह जळगाव आणि धुळे पोलीस ठाण्यात पगारे यांच्या पुढाकारातून कार्यकर्त्यांनी मला अटक करावी, अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांनी सबनीस निर्दोष असल्याचा अहवाल दिला होता. दहा वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे. माझ्यावर अॅट्रोसिटी दाखल करण्याची त्याची पहिलीच वेळ नाही. आत्तापर्यंत तीनवेळा पगारे यांनी अॅट्रोसिटी दाखल केली आहे. पण मी निर्दोष सुटलो आहे. आता हे नवीन प्रकरण समोर आले आहे. २०११मध्ये त्यांनी प्राध्यापकाच्या प्रमोशनासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. ही गोष्ट उघडकीस आणल्याचा राग मनात धरला. त्याच्या नोकरीला धोका निर्माण झाल्यामुळे त्याने ही खोटी केस दाखल केली आहे. तरीही संपूर्ण दलित समाज माझ्या पाठीशी असल्याचा विश्वास सबनीस यांनी व्यक्त केला.