सुधन्वाच्या घरी पुन्हा एटीएसची कारवाई ; मोबाईल, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क, कागदपत्रे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:12 PM2018-08-13T15:12:28+5:302018-08-13T15:23:05+5:30
राज्यात घातपात घडवून आणण्याच्या हेतूने मोठा शस्त्रसाठा बाळगणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या तिघांना एटीएसने अटक केली आहे़. त्यांच्याकडून अजूनही मोठा शस्त्रसाठा मिळत असल्याचे सोमवारी उघड झाले़.
पुणे : राज्य दहशतवाद विरोधी पथकाने वैभव राऊत याला मदत करणाऱ्या सुधन्वा गोंधळेकर याला अटक केल्यानंतर पुणे परिसरातून मोठा शस्त्र साठा शनिवारी जप्त केला होता़. त्यानंतर आता आणखी काही साहित्य जप्त करण्यात आले आहे़. राज्यात घातपात घडवून आणण्याच्या हेतूने मोठा शस्त्रसाठा बाळगणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या तिघांना एटीएसने अटक केली आहे़. त्यांच्याकडून अजूनही मोठा शस्त्रसाठा मिळत असल्याचे सोमवारी उघड झाले़. नालासोपारा येथून एटीएसने आणखी काही शस्त्रे जप्त केली आहेत़.
पुणे परिसरातून १ लॅपटॉप, ६ हार्डडिस्क, ५ पेनड्राईव्ह, ९ मोबाईल, अनेक सिमकार्डस,१ वायफाय डोंगल, १ मोटार, १ मोटारसायकल आणि बरीच कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याचे एटीएसने सांगितले आहे़ .
एटीएसने सुधन्वा गोंधळेकर याच्याकडून शनिवारी मोठा शस्त्र साठा जप्त केला आहे़. त्यात १० गावठी पिस्तुल मॅगझिनसह, १ गावठी कट्टा, १ एअरगन, १० पिस्टल बॅरल, ६ अर्धवट तयार पिस्टल बॉडी, ६ पिस्टल मॅगझिन, ३ अर्धवट तयार मॅगझीन, ७ अर्धवट तयार पिस्टल स्लाईउ, १६ रिले स्विच, ६ वाहनांच्या नंबर प्लेटस, १ ट्रिगर मॅकॅनिझम, १ चॉपर, १ स्टील चाकू असा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे़. तसेच इतर अर्धवट बनलेले शस्त्राचे सुटे भाग, टॉर्च, बॅटरी, हँड ग्लोव्हज, इतर अनुषंगिक साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुस्तके, स्फोटकाबाबत हँड बुक, एक्प्लोसिव्ह व मोबाईल प्रिंटआऊट, रिले स्विच सर्किट ड्रॉईग, पेनड्राईव्हज, हार्डडिक्स, मेमरी कार्ड इत्यादी साहित्य जप्त केले होते़ .अधिक तपासात रविवारी व सोमवारी आणखी काही साहित्य जप्त केले आहे़.
नालासोपारा परिसरातून आणखी शस्त्र साठा जप्त करण्यात एटीएसला यश मिळाले आहे़. त्यात ५ गावठी पिस्टल, ३ अर्धवट तयार गावठी पिस्टल, ११ नाईन एम़ एम़ राऊंड, ३० ७़६५ राऊंड, शस्त्रांस्त्रांचे अनेक सुटे भाग त्यात स्प्रिंग्ज, ट्रिगर यांचा समावेश आहे़.
याअगोदर नालासोपारा येथील वैभव राऊत याच्या घरातून तसेच एका दुकानातून एटीएसने २२ गावठी बॉम्बसह स्फोटकांचा साठा शुक्रवारी जप्त केला होता़. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्याशी संबंधित लोकांकडे सध्या एटीएस चौकशी करीत असून ते कोणाकोणच्या संपर्कात होते़. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे ते कधी ये जा करत होते़ याची माहिती घेतली जात आहे़.
यांच्याकडे काही अर्धवट तयार झालेली गावठी पिस्टल सापडली आहेत़. यावरुन त्यांनी दुकानात हत्यारे तयार करण्याचा कारखानाच सुरु केला होता का अशी शंका निर्माण झाली आहे़. त्यासाठी त्यांना यातील तरबेज कारागीरांची मदत घ्यावी लागणार असावी असे दिसून येत आहे़.