खलिस्तानवाद्यांच्या साथीदाराचा शोध घेण्यास एटीएसचे पथक दिल्लीला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 07:51 PM2019-01-08T19:51:47+5:302019-01-08T19:59:34+5:30
खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित असल्याचे पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दोन आरोपींच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.
पुणे : खलिस्तानवादी चळवळीशी संबंधित असल्याचे पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दोन आरोपींच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.
या प्रकरणात हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (रा. पंजाब) यास अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान, त्याचा साथीदार मोईन खान (रा. पंजाब) याचा गुन्हयात सहभाग आढळून आल्याने एटीएसचे पथकाने २४ डिसेंबर रोजी खान याला ताब्यात घेतले. मंगळवारी खान याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला एटीएसने अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वढणे यांचे न्यायालयात हजर केले. दिल्ली येथे तपासासाठी एक पथक गेले असल्याने आरोपीचा पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
हरपालसिंग व मोईन खान हे सोशल मिडियाच्या माध्यमातून खलिस्तानवादी चळवळीत सक्रिय आहेत. वेगवेगळ्या २० देशातील लोकांशीही ते संर्पकात असल्याचे आणि बनावट नावाने फेसबूक खाती असल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले आहे. खलिस्तान निर्मितीसाठी तुरुंगातील आरोपी सोडविण्याची तयारी, हत्यारे गोळा करण्याची तयारी त्यांनी केल्याचे सोशल मीडिया आणि मोबाईलच्या विश्लेषणातून समोर आले आहे. आरोपींचा एक सक्रिय साथीदार गुरुजीत निज्जर (सायप्रस देश) हा एटीएसला निष्पन्न झाला असून त्याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले जात आहे. हरपालसिंग आणि मोईन खान यांचे सोशल मिडिया आणि मोबाइल डाटामधील माहितीचे विश्लेषण करण्यात येत असून त्याआधारे नवीन धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. दोघांशी संबंधित असलेला दिल्ली येथील साथीदाराचा शोध घेण्याकरिता एटीएसचे एक पथक दिल्लीत गेले असून त्यांच्या हाती महत्वपूर्ण माहिती लागल्यास आरोपीची पुन्हा पोलीस कोठडी घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.