राजगडावर मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:10 AM2018-04-02T03:10:07+5:302018-04-02T03:10:07+5:30
हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर रविवारी मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये ४ पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
वेल्हे - हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर रविवारी मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये ४ पर्यटक जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी,की राजगड किल्ल्यावर शनिवारी रात्री काही पर्यटक मुक्कामी थांबले होते. रविवारी सकाळी हे पर्यटक बालेकिल्ला सर करत होते. त्यावेळी बालेकिल्ल्यावरून काही युवकांचा गोंगाट ऐकायला मिळाला. मधमाश्यांचे पोळे उठले असल्याने काही युवक धावत खाली येत होते. त्यावेळी पंकज जगदाळे, आशिष पाटील, युवराज अहिरे, प्रतीक चवर (सर्व रा. आळंदी) या पर्यटकांवर मधमाश्यांनी हला केला. माश्यांनी चावे घेतल्याने हे चौघे गंभीर जखमी झाले. तसेच घाबरून पळताना पडल्यामुळे अंगावर जखमाही मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. गाडावर ताक विकणाऱ्या संतोष ढेबे यांनी जखमींना मदत करत आडोशाला नेले. गडाच्या पायथ्याशी असणाºया गुंजवणे येथील पोलीस पाटील बाळकृष्ण रसाळ यांनी जखमींवर गावात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना खासगी वाहनातून नसरापूर येथील रुग्णालयात दाखल केले.
राजगडावर अनेक ठिकाणी अतिशय जुनी अशी अनेक आग्या मोहोळे असून पर्यटकांकडून आशा ठिकाणाहून जाताना मोहोळांना दगड मारणे, आरडओरडा करणे असे प्रकार घडतात. येणाºया पर्यटकांनी आपल्या जीवाचा विचार करून धोका न स्वीकारता गडभ्रमंती करावी जेणेकरून काही अपघात होणार नाही. गडावर दुर्घटना घडल्यास तत्काळ मदतीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. - बाळकृष्ण रसाळ,
पोलीस पाटील, गुंजवणे