अडीच महिन्याच्या चिमुकल्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, दौंडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 06:54 PM2024-11-17T18:54:48+5:302024-11-17T18:56:49+5:30
ग्रामस्थांनी बिबट्या दिसणाऱ्या भागांची माहिती देऊनही वनविभागाचे त्याकडे दुर्लक्ष
केडगाव: दौंड तालुक्यातील बोरीपार्धी हद्दीत चिमूरड्या अडीच महिन्याच्या बालकावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. तात्काळ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मानेचा चावा बिबट्याने घेतला होता. प्रचंड रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान चिमुकल्याचे निधन झाले.
रविवारी दि १७ रोजी दुपारी ४ दरम्यान सदर घटना घडली. दोन उसाला झोळीमध्ये चिमुकल्याला आईने झोपवले होते. आई-वडील समोरील शेतात ऊसतोड करत होते. सदर कुटुंब करण दिलीप गायकवाड (मुळगाव शिदवाडी ता. चाळीसगाव जि. जळगाव ) सध्या (रा. केडगाव टोल नाका ता. दौंड जि. पुणे) हे ऊस गुऱ्हाळावर तोडीसाठी गेल्या पाच वर्षापासून काम करत आहे. ऊसतोड (सरगरमळा) बोरीपार्धी येथील बाळासो भागुजी टेंगले यांच्या शेतात चालू होते. परिसर पूर्ण ऊस शेती असल्यामुळे शेतात बिबट्या लपल्याचे या मजुरांना समजले नव्हते. त्याच्या भोवती खेळत असलेल्या चिमुकलीने आरडाओरडा केल्यानंतर तिच्यावर होणारा हल्ला टळून तो अडीच महिन्याच्या त्या चिमुरड्यावर झाला. हल्ला झाल्यावर परिसरातील लोकांनी प्रचंड मोठा आरडाओरडा केला. बिबट्याने त्या चिमुकल्याला तेथेच सोडून उसात पळ काढला. ही हृदय द्रावक घटना पाहून गरीब शेतमजूर आई-वडिलांनी हंबरडा फोडला. पाहणाऱ्याचे डोळे ओलावले होते. जेवण ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल वाय. के. वीर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
गेल्या दोन दिवसापूर्वी शिरूर तालुक्यातील मांडवगण येथे एका चिमुकल्यावर हल्ला झाला होता. जनावरांवर हल्ल्यांचे तर नियमित झाले आहेत. मात्र मानवावर होणाऱ्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केडगाव, बोरीपार्धी व दौंड तालुक्यातील सर्वच ग्रामस्थांनी वनविभागाला कळवले होते. मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याच्या आढळून येते. गेल्या तीन महिन्यात एकही बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही. त्यामुळे बिबट्याचा फैलाव वाढतच चालला आहे. नागरिकांनी प्रचंड संताप वनविभागावर व्यक्त केला. वन अधिकाऱ्या भोवती नागरिकांनी घेराव घातला होता.
शेतकरी वर्ग भयभीत
केडगाव बोरीपार्धी हा प्रचंड लोकवस्ती असलेला परिसर आहे. इथे हल्ला झाल्याने नागरिक हवालदिल आहे. बिबटयाच्या मानवी हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याची दौंड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे.