सिमेंटचा ब्लॉक मारुन कॅबचालकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:44+5:302020-12-16T04:28:44+5:30
पुणे : मोटारीतून घरी जात असताना सिमेंटचा ब्लॉक काचेवर मारुन कॅबचालकाला लुटणार्याचा प्रयत्न केला. तरुणाने विरोध केल्यावर चोरट्यांनी त्यांच्या ...
पुणे : मोटारीतून घरी जात असताना सिमेंटचा ब्लॉक काचेवर मारुन कॅबचालकाला लुटणार्याचा प्रयत्न केला. तरुणाने विरोध केल्यावर चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून जबर जखमी केले. हा प्रकार होत असतानाच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त घालत तेथे पोहचले. त्यांनी दोघा चोरट्याला पाठलाग करुन पकडले. जबर जखमी झालेल्या कॅबचालकाला पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
अरुण रंगनाथ लांडे (वय ४२, गंगानगर, फुरसुंगी, हडपसर) असे जखमी झालेल्या ओला कॅबचालकाचे नाव आहे. ही घटना सिहंगड रोडवरील पानमळा वसाहत येथे १४ डिसेंबरला पहाटे अडीच वाजता घडली. अरुण लांडे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असून अद्याप ते बेशुद्ध आहेत.
उमेशकांत कुमार गौतम ऊर्फ उभ्या (वय २२, रा. वडगाव बुद्रुक) आणि शंकर ऊर्फ कोळ्या नाना राऊत (वय १८, रा. जनता वसाहत, पर्वती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एका अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विक्रम पवार यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अरुण लांडे हे ओला कॅबचालक आहेत. प्रवाशांना सोडून ते पहाटे अडीच वाजता सिंहगड रोडवरुन जात होते. यावेळी तिघांनी सिमेंट ब्लॉक मारुन त्यांच्या गाडीची काच फोडली. त्यामुळे त्यांनी गाडी थांबविली असता तिघांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. लांडे यांनी त्याला विरोध केल्याने तिघांनी लाथाबुक्क्यांनी व सिमेंट ब्लॉक त्यांच्या डोक्यात मारुन जबर जखमी केली.
याबाबत तपासी अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक सुरेंद्र धुमाळे यांनी सांगितले की, हा प्रकार सुरु असतानाच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विक्रम पवार व त्यांचे सहकारी श्रीमंगळे, झंझळे, रसाळ, धनके हे गस्त घालत तेथे आले. त्यांनी पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. अरुण लांडे यांच्या डोक्यात मार लागल्याने त्यांनी तातडीने १०८ वर फोन करुन रुग्णवाहिकेतून त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. ते अद्याप बेशुद्ध आहेत. दोघा चोरट्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.