खराडीतील कोविड रूग्णालयावर समाजकंटकाकडून भ्याड हल्ला; डॉक्टर्स असोसिएशनतर्फे तीव्र निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 05:58 PM2020-08-18T17:58:52+5:302020-08-18T18:01:35+5:30
या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पुणे : कोरोना काळात रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी शहरातील विविध रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये डॉक्टर,कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहे. या कोविड केअर रुग्णालयांचा अनेकांना चांगला फायदा होत आहे. मात्र,खराडीतील रायझिंग मेडिकेअर या कोविड रुग्णालयावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला करत दगडफेक केली आहे. या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्सिजन सिलेंडची वाहतूक करताना त्याचा आवाज होतो म्हणून काही स्थानिकांनी हॉस्पिटलवर सोमवारी ( दि. १८) दुपारी हा भ्याड हल्ला केला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.
खराडीतील रायझिंग मेडिकेअर हे कोविड रुग्णालय असल्यामुळे तेथे ऑक्सिजन सपोर्टची सतत गरज लागत असते.या ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करताना आवाज होतो म्हणून काही स्थानिकांनी हॉस्पिटलवर दगडफेक केली. तसेच तिथे कोविड ड्युटीवर काम करणाऱ्या डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांच्या जिविताला धोका उत्पन्न केला. याबाबत वडगावशेरी चंदननगर खराडी डॉक्टर्स असोसिएशनच्या तर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत चंदननगर पोलिसांची भेट घेऊन आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी केली.
पोलीस प्रशासनाने संबंधित दोषींवर सुधारित हॉस्पिटल प्रोटेक्शन व पॅनडेमिक कायद्यानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अशी आग्रही भूमिका घेत डॉक्टरांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या कलमानुसार कारवाई व्हावी असे लेखी निवेदन चंदननगर पोलिसांना दिले. यावेळी चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव खटके यांनी याप्रकरणी दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळास दिले आहे.
यावेळी चंदननगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शंकर खटके,डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत दौंडकर पाटील,विशाल मुरकुटे,योगेश गायकवाड,संतोषकुमार शिंदे,भाऊसाहेब जाधव,रायझिंग हॉस्पिटलचे डॉ. विनोद भारती,सुमेध गिरी ,सचिन पठारे,नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यावेळी उपस्थित होते.
........................
रूण्यालय सुरक्षा कायदा , आपत्ती व्यववस्थापक कायदा ,साथीचे रोग प्रतिबंदक कायद्या या अंतर्गत दोषी व्यक्तीवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
- डॉ.विनोद भारती,रायझिंग हॉस्पिटल