गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध

By admin | Published: February 17, 2015 01:28 AM2015-02-17T01:28:31+5:302015-02-17T01:28:31+5:30

पुरोगामी विचारवंत आणि ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा शहरातील विविध संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला.

The attack on Govind Pansare's severe protest | गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध

गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध

Next

पिंपरी : पुरोगामी विचारवंत आणि ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा शहरातील विविध संघटनांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेचा निषेध करीत पिंपरीत कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी सोमवारी दुपारी निदर्शने केली.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे आयटक, सिटू, श्रमिक एकता महासंघ, यूथ फेडरेशन, नागरी हक्क सुरक्षा समिती आदी संघटनांनी कॉम्रेड पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या वेळी माधव रोहम, शरद गोडसे, मानव कांबळे, विजय कदम, एल. एस. मारू, किशोर ढोकळे आदी उपस्थित होते. कामगार संघटनांनी लाल झेंडे फडकावीत, घटनेच्या विरोधात घोषणा दिल्या.
कांबळे म्हणाले, ‘‘भ्र्रष्टाचाराविरुद्ध लढणारे सतीश शेट्टी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर आता कॉम्रेड पानसरे यांच्यावर हल्ला करण्यात आला. यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरील संकट अधिकच तीव्र झाले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच अशा घटना घडत आहेत. आम्ही काहीही करू शकतो; आमचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही, असा विश्वास या प्रतिगामी शक्तींना वाटू लागलाय.’’
हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पावले उचलावीत. त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी या संघटनांनी केली.
राष्ट्रीय समाज पक्षातर्फे हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि प्रवक्ते दीपक बिडकर निषेध व्यक्त करताना म्हणाले, ‘‘ही अत्यंत धक्कादायक घटना असून,
पुरोगामी महाराष्ट्रात असे घडणे निषेधार्ह आहे. या प्रकरणातील हल्लेखोर तातडीने पकडावेत,
अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करीत आहोत. विचार मांडणाऱ्या, सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपुढे अशा घटना मोठे प्रश्नचिन्ह उभे करतात. राज्याची प्रतिमा धोक्यात येते. त्यामुळे हल्लेखोरांवर कडक कारवाई
झाली पाहिजे.’’
कोल्हापूर येथे झालेल्या या भ्याड हल्ल्याचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. परिषदेचे शहराध्यक्ष संतोष लोंढे, उपाध्यक्ष रवींद्र माळी, आनंदा कुदळे, ज्ञानेश्वर मोंढे, पी. के. महाजन, काळुराम गायकवाड, मच्छिंद्र दरोडे, मंगलदास खैरनार, विश्वनाथ गांगुर्डे यांनी या हल्ल्याचा निषेध केला.

Web Title: The attack on Govind Pansare's severe protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.