निघोजमध्ये निवडणुक वादातून एकाच्या घरावर हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 09:36 PM2018-04-05T21:36:02+5:302018-04-05T21:36:02+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर, एका हॉटेलवर आणि चार वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली.

attack on the house due to election dispute | निघोजमध्ये निवडणुक वादातून एकाच्या घरावर हल्ला 

निघोजमध्ये निवडणुक वादातून एकाच्या घरावर हल्ला 

Next
ठळक मुद्देहॉटेलवर दगडफेक : चार गाड्यांची तोडफोडएकाला मारहाण करण्यात येऊन त्याच्या मुलास जिवे मारण्याची धमकी

कुरळी : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून माजी जिल्हा परिषद सदस्याच्या घरावर, एका हॉटेलवर आणि चार वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आली. एकाला मारहाण करण्यात येऊन त्याच्या मुलास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही धक्कादायक घटना निघोजे (ता. खेड) येथे बुधवारी (दि. ४) रात्री घडली. या प्रकरणी येथील सात जणांवर चाकण पोलिसांत गुरुवारी (दि. ५) गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 
 सतीश हिरामण येळवंडे (रा. निघोजे, कुरण वस्ती, ता. खेड, जि. पुणे) व त्याचे सहा अन्य साथीदार (नावे निष्पन्न नाहीत) यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली. 
संतोष शिंदे याने चाकण पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की  त्यांची आई शीला शिंदे या २००७ ते २०१२ दरम्यान जि. प. सदस्य होत्या, तसेच पत्नी कांचन या निघोजे गावाच्या २०१२ ते २०१७ दरम्यान सरपंच होत्या. मागील वर्षी २०१७मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या व विरोधकांच्या पॅनलमध्ये अत्यंत चुरशीने लढत झाली होती. त्यामुळे विरोधकांमध्ये मोठा द्वेष निर्माण झाला होता. तसेच गावात एक जमीन खरेदी केल्याच्या कारणावरून काही जणांनी जमीन मोजणीच्या वेळी शिवीगाळ व दमदाटी केली होती. बुधवारी (दि. ४) रात्री दहाच्या सुमारास जेवण करून घरातील सर्व जण झोपले असता अचानक घरावर दगडफेक सुरू झाली. सतीश येळवंडे व त्याचे साथीदार शिवीगाळ करीत दगडफेक करीत असल्याचे लक्षात आले. सतीश येळवंडेने संतोष शिंदे याला मोबाईलवर फोन करून घराबाहेर ये, तुझा खून करतो अशी धमकी दिली. तू निवडणुकीत आमच्या बाजूने न राहता विरोधात प्रचार केला, तुला सोडणार नाही, अशी दमबाजी करून निघून गेला.
त्यानंतर संबंधित टोळके हॉटेल कॅनिव्हल येथे जाऊन धिंगाणा घालू लागले. यात त्यांनी हॉटेलचा सुरक्षारक्षक अमर बहादूर सिंग याला कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ दमदाटी करीत मारहाण केली. दगडफेक करून काचा फोडल्या. तसेच सदर गावठाण येथे असलेली वैभव विलास येळवंडे यांची मोटारीची ( एमएच १४ जीए १९७१) पाठीमागील काच कोयत्याने फोडली. तसेच सचिन येळवंडे यांची मोटार(एमएच १४ ईसी ५७३२) व मोटारकार (एमएच १४ ई यू ६८२५) फोडून निघून गेले. 
हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चाकण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

Web Title: attack on the house due to election dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.