जेएनयूवरील हल्ला अभाविपने केलेला नाही; पुरावे असतील समोर आणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 08:41 PM2020-01-06T20:41:14+5:302020-01-06T20:44:53+5:30
विद्यापीठांमध्ये जर कुणी असे हल्ले करीत असेल तर त्याची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी.
पुणे : जेएनयूवरील हल्ला हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेला नाही. जर केला असेल तर त्याचे पुरावे द्यावेत आणि ते दिल्यास न्यायालयासमोर त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, अशा रोखठोक शब्दांत अभाविपचे पुणे महानगरमंत्री अनिल ठोंबरे यांनी विरोधकांना सुनावले.
जेएनयूवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात अभाविपचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानेही सात वर्षांपूर्वी एका लघुपटाच्या स्क्रिनिंगवरून विद्यार्थ्यांवर हल्लाबोल केला होता, याचा पुनरूच्चार केला आहे. यापार्श्वभूमीवर अनिल ठोंबरे यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला असता ते म्हणाले २०१३ मधला संदर्भ जर एफटीआयआयचे विद्यार्थी देत असतील तर पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा राज्यांमध्ये रोज ज्या घटना घडत आहेत. २०१७ मध्ये पश्चिम बंगालमधल्या अभाविपच्या हल्ले केले गेले. केरळमध्ये त्यांचा मुख्यमंत्री ज्या मतदारसंघात निवडून आला तिथेही अभाविपच्या कार्यकर्त्यावर हल्लाकार्यकर्त्यांवर झाला. आज जेएनयूमध्ये आमच्या राष्ट्रीय मंत्री असलेल्या विद्यार्थ्यांवर देखील हल्ला झाला आहे. त्याचे पुरावे देखील आहेत. हिंसाचार करण्याची वृत्ती कुणाची राहिली आहे. हे सर्वांना माहिती आहे. आपल्या देशाने माओवाद, नक्षलवाद कधीही स्वीकारलेला नाहीये. त्याला समर्थन करणारे कोण आहेत हे सर्वजण जाणतात.
मुळात जेएनयूवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता. डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आणि संघटनेच्या अध्यक्षा आयिशा घोष यांच्यासह ३५० कार्यकर्ते व अभाविपचे कार्यकर्ते हॉस्टेलच्या कँम्प्सबाहेर होते. त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. विद्यापीठांमध्ये जर कुणी असे हल्ले करीत असेल तर त्याची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी. या पूर्वनियोजित कटामध्ये जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. एखादा विशिष्ट अजेंडा घेऊन विद्यापीठांमध्ये हिंसाचार करणे हा त्यांचा एकमेव हेतू आहे. ज्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला आहे. त्यातील जे विद्यार्थी एम्स रूग्णालयात अॅडमिट आहेत. त्यातील २५ विद्यार्थी हे अभाविपचे आहेत. याची चौकशीही करू शकता. त्यामुळे हल्ला करण्याची चौकशी कुणाची राहिली आहे. याची चौकशी करावी आणि त्याची पाळमुळं शोधून काढावी. अभाविप बद्दल न्यायालयासमोर पुरावे आलेले नाहीत किंवा पोलिसांनी रिपोर्ट दिलेला नाहीये. त्यामुळे अभाविपचे नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे ठोंबरे यांनी स्पष्टपणे सांगितले.