Pune: खराडीत अतिक्रमण पथकावर हल्ला; पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 08:55 PM2023-07-26T20:55:40+5:302023-07-26T21:00:02+5:30
जमाव गोळा करून अतिक्रमण पथकावर हल्ला...
चंदननगर (पुणे) : नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खराडीत अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करत असताना विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला केल्याची घटना (दि. 25) घडली. अतिक्रमण निरिक्षक भिमाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील स्विट इंडीया चौकातील गंगा कांन्स्टीला येथे अनधिकृत भाजी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ता व्यापल्याने वाहनचालकांना नागरीकांना नाहक त्रास होत असल्याने मंगळवारी कारवाईसाठी दोन निरिक्षक, बिगारी, सुरक्षा रक्षक कारवाईसाठी गेले असता अनधिकृत भाजी विक्रेत्यांनी जमाव गोळा करून अतिक्रमण पथकावर हल्ला करून मारहाण केली.
याबाबत चंदननगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंडे (वय 24, रा. बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बाळासाहेब किसन गायसमुद्रे (वय-49), सुमित सुनील गिरी (वय 21), शेखर बाळासाहेब गायसमुद्रे (वय-21), सुनील बंडू गिरी (वय-45), गणेश बाळासाहेब गायसमुद्रे (वय- 19, सर्व राहणार खराडी) यांना अटक करण्यात आली आहे.
नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक भिमाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंडे आणि त्यांचे इतर दहा ते बारा सहकारी मिळून नगर रस्ता परिसरातील वडगाव शेरी विमाननगर आणि खराडी येथील पदपथावर अनधिकृतित्या बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत होते. खराडी येथील स्वीट इंडिया चौकात अतिक्रमण विरोधी पथक दाखल झाल्यानंतर येथे पदपथावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संशयित आरोपींनी कारवाईला विरोध करीत स्वतःच्या हाताने भाजीपाला रस्त्यावर फेकला. त्यानंतर अतिक्रमण पथकावर हल्ला करीत मारहाण केली.
घटनेची माहिती पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रमुखांना आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. खराडी येथे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना आमच्या सोबत पोलीस बंदोबस्त नव्हता. तसेच महिला कर्मचारीही आमच्या सोबत नाहीत. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांकडून पुणे महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला करण्याच्या, दमदाटी करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.